उदयनराजे भोसलेंची मोठी घोषणा; म्हणाले, “आझाद मैदानात…!”
छत्रपती शिवाजी महाराजांविषयी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या विधानामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. यापार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असणारे उदयनराजे भोसले यांनी संताप व्यक्त केला आहे. आज रायगडावरून उदयनराजे भोसले बोलत होते.
उदयनराजे भोसले म्हणाले की, “लवकरच एक तारीख ठरवून मुंबईतल्या आझाद मैदानात जायचंय. आजचा दिवस इतिहासात लिहून ठेवण्यासारखा दिवस आहे. आज आपण सगळे इतिहासाचा भाग झालो आहोत. कुठल्याही प्रकारे यात राजकारण येऊ देऊ नका. यामागे कुणाचाच स्वार्थ नाही. शिवाजी महाराजांचा अवमान यापुढे कुणी करूनच दाखवावा. काय होईल, ते आपल्या परीने आपण बघूनच घेऊ” असा इशाराच त्यांनी दिला आहे.
यासोबतच ते म्हणाले की, महाराजांचा जयघोष करण्यासाठी आलो असतो, तर वेगळा आनंद झाला असता. पण आपण काय करतोय? शिवसन्मानाचा निर्धार करण्याची वेळ आपल्यावर आलीये. या लोकांना लाजा वाटल्या पाहिजेत की वैयक्तिक स्वार्थासाठी लोकांच्या विचारात तुम्ही बदल केला. शिवाजी महाराजांचा आपण सन्मान करायला हवा हे बोलावं लागतं. असे उदयनराजे म्हणाले.