Shravan Somvar : Trimbakeshwar : पहिल्या श्रावण सोमवारी त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी
दोन वर्षे बंद असलेल्या ब्रम्हगिरी प्रदक्षिणेसह त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. कोरोनामुळे (Corona) सर्व बंद असल्या कारणाने कोणालाही दर्शन घेता येत नव्हते. सर्व नियम आता उठल्याने भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथील ज्योतिर्लिंग देवस्थान येथे प्रत्येक सोमवारी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. पहाटे चार वाजताच मंदिर उघडण्यात आले आहे.
आज पहिला श्रावण सोमवार असल्याने ब्रम्हगिरी प्रदक्षिणेला अनेक भाविक दाखल होत आहेत. शिवाय काही भाविकांनी काल मध्यरात्री पासून प्रदक्षिणेला सुरवात केल्याचे पाहायला मिळाले. देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर येथे देशभरातून भाविक येत असतात. त्याच प्रकारे या ठिकाणी श्रावण महिन्यात देखील मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत असते. गर्दीचा अंदाज घेत भाविकांच्या वाहन पार्किंगसाठी सहा ठिकाणी वाहनतळ उभारण्यात आले आहेत.
नाशिकपासून अवघ्या 28 किलोमीटर अंतरावर त्र्यंबकेश्वर मंदिर आहे. गोदावरी नदीचे उगम स्थान असलेल्या ब्रम्हगिरी पर्वताच्या पायथ्याशी त्रयंबकेश्वर वसलेले आहे. सध्याचे मंदिर तिसरे पेशवे बाळाजी बाजीराव ( सन 1740 ते 1760 ) यांनी जुन्या मंदिराच्या जागेवर बांधले आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाने व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले होते. मात्र, या वर्षी त्यांना ही गर्दी पाहता दिलासा मिळाल्याचे दिसत आहे.