मुंबईतील पाचही टोलनाक्यांवर हलक्या वाहनांना टोलमाफी; मनसे अध्यक्ष राज ठाकरे पोस्ट करत म्हणाले...

मुंबईतील पाचही टोलनाक्यांवर हलक्या वाहनांना टोलमाफी; मनसे अध्यक्ष राज ठाकरे पोस्ट करत म्हणाले...

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठी घोषणा करण्यात आली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठी घोषणा करण्यात आली आहे. मुंबईत पाचही टोलनाक्यांवर हलक्या वाहनांना टोलमाफी करण्यात आली आहे. आज रात्री बारा वाजल्यापासून याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

दहिसर, मुलुंड पूर्व आणि पश्चिम, ऐरोली आणि वाशी, आनंदनगर या मुंबईतील प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर टोलमाफी करण्यात आली आहे. विधानसभा आचारसंहितेआधी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. यावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे म्हणाले की, मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर आज मध्यरात्रीपासून हलक्या वाहनांना टोलमुक्ती मिळणार आहे. याबद्दल एमएमआर परिसरात राहणाऱ्या सर्व नागरिकांचे अभिनंदन आणि माझ्या महाराष्ट्र सैनिकांचा खूप खूप अभिनंदन.

टोलच्या व्यवहारात पारदर्शकता हवी, आणि जिथे रस्त्याच्या कामांचे पैसे वसूल झालेत, तिथले रस्ते टोलमुक्त झाले पाहिजेत या मागणीसाठी माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी प्रचंड संघर्ष केला... आम्ही टोलनाक्यांची तोडफोड केली यावरून आमच्यावर टीका झाली, पण सरकार नावाची यंत्रणा कुठलीही असो, त्यांना टोकाचं पाऊल उचलल्याशिवाय गांभीर्य कळत नाही.

पण असो... किमान मुंबईकर टोलमुक्त झाला आणि आमच्या आंदोलनाला बऱ्यापैकी यश आलं ही आनंदाची बाब. यासाठी राज्य सरकारचं मी अभिनंदन करेन, पण फक्त हा निवडणुकीपुरता घेतलेला निर्णय नाही, याची खात्री सरकारने जनतेला द्यायला हवी. आज मुंबई टोलमुक्त झाली पण त्या आधी किती लोकांनी टोलच्या या खेळात, संपत्तीच्या राशी उभ्या केल्या याचा हिशोबच नाही. खरंतर याची निष्पक्ष चौकशी व्हायला हवी. पण ती होईल याची फारशी खात्री नाही, कारण कोणी कोणाला पकडायचं हा प्रश्न आहे. पण ठीक आहे, मुंबईकर टोलच्या ओझ्यातून मुक्त झाले हे बरे झाले.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्र सैनिकांनो, यापुढे 'टोलच्या आंदोलनाचं काय झालं?' असं कोणी विचारलं तर त्यांना मुंबई टोलमुक्तीचं उदाहरण अभिमानाने सांगा आणि तुम्ही एकदा ठरवलंत की गोष्ट तडीस नेता हे पुन्हा एकदा दिसलं हे विसरू नका. पुन्हा एकदा सर्वांचं अभिनंदन. असे राज ठाकरे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com