‘गणपती बाप्पा मोरया’च्या गजरात बाप्पांचे घरोघरी होणार आगमन; जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजा विधी
लाडक्या गणरायाचे आज घरोघरी आगमन झाले. घरोघरी आणि सार्वजानिक गणेश मंडळात, घरोघरी एकदंत, विघ्नहर्ता गणरायाचे आज आगमन झाले. ‘गणपती बाप्पा मोरया…मंगलमूर्ती मोरया!’…एक..दोन..तीन..चार…गणपतीचा जय जयकार!…असा जयघोष…ढोल-ताशांचा घुमणारा आवाज…गुलाल, फुलांची उधळण…अशा उत्साहात आज घरोघरी बाप्पाचे आगमन झाले. मुंबई, पुण्यासह राज्यभरात आगमन सोहळ्याचा उत्साह दिसून आला. अनेक सार्वजनिक मंडळे आणि घरगुती गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली.
रिक्षा, मालवाहू टेम्पो, कार आणि मोटरसायकलींवरून भक्त गणेशमूर्ती घरी घेऊन येत होते. तर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी ढोल-ताशांच्या गजरात मूर्ती मंडळांमध्ये नेल्या. भक्तांच्या गर्दीने शहरांतील रस्ते फुलून गेले होते.आरती, गणपती स्त्रोत, मंत्र असे मंगलदायी वातावरण घरोघरी पाहायला मिळत आहे. ढोल-ताशांचा गजर, गुलाल, फुलांची उधळण करत मूर्ती मंडपात नेण्यात आल्या. लालबागचा राजा, गणेशगल्लीचा राजासह मुंबईतील सार्वजनिक गणेश मंडळांतील बाप्पा थाटामाटात स्थानापन्न झाले. पुणेही बाप्पाच्या आगमनाने भक्तिमय झाले.
शुभ मुहूर्त
गणेश चतुर्थी: बुधवार, 31 ऑगस्ट 2022
गणपती मूर्ती स्थापनेचा मुहूर्त : 31 ऑगस्ट रोजी सकाळी 11.5 ते दुपारी 1.38 स्थापन करता येईल.
पूजेची तयारी
गणेशाची छोटी मूर्ती, श्रीफळ, कापड, कापसाची माळा, हार, सुट्टी फुले व नाणी, अत्तर, गूळ-खोबरे, सुपारी, देठाची पाने, मिठाई, मोदक, कापसाचे वस्त्र, अगरबत्ती, कापूर, दूर्वा, हळदी-कुंकू-अबीर-गुलाल, दिवा, तेल, समई, वाती, फळे, पंचामृत, नैवेद्य, चंदन, अष्टगंध, पळी, पंचपात्र, जानवे, शमीपत्रे, आंब्याची डहाळी, ताम्हण, कलश, शंख, घंटा, अक्षता आदी साहित्य लागतात.
गणपती प्रतिष्ठापना विधी
प्रथम कपाळाला गंध लावून आचमन करावे. देवापुढे देवापुढे विड्याचे पान त्यावर नाणे आणि सुपारी ठेवावी. देवास नमस्कार करून वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घ्यावेत आणि पुजेला प्रारंभ करावा. आसनावर बसावे. हातात अक्षता घेऊन श्रीगणेशाचे मनात स्मरण करावे. अक्षता श्रीगणेशाच्या पायांवर वाहाव्यात. उजव्या हातात दोन पळ्या पाणी घेऊन त्यात गंध, अक्षता, फुले घेऊन मंत्रोच्चार करावा. श्रीगणेशाचे स्मरण करून कलश, शंख, घंटा, दिवा, समई यांची पूजा करावी गंध, अक्षता, फुले, हळद कुंकू वहावे.
नमस्कार करून उजवा हात मूर्ती वर ठेवावा डावा हात स्वतःच्या हृदयास स्पर्श करून श्रीगणेशाचे ध्यान करावे. गणेशाच्या चरणांवर दुर्वा किंवा फुलाने पाणी शिंपडावे. गणपतीच्या चरणांवर गंध फुल अक्षता वाहावे. ताम्हणात 4 वेळा पाणी सोडावे. गणेशाच्या मूर्तीवर पाणी शिंपडावे, चरणांवर पंचामृत वहावे, अक्षता वाहाव्यात. गंध लावावे, हळद, शेंदूर, फुले,हार, कंठी, दुर्वा वाहाव्यात. धूप, अगरबत्ती ओवाळावी. दीप, निरांजन ओवाळावे. नैवेद्य, प्रसाद अर्पण करावा. विड्यावर दक्षिणा ठेवावी, समोरील नारळावर पळीभर पाणी सोडावे आणि त्यावर एक फुल वाहावे. आरती करावी, स्वतः भोवती प्रदक्षिणा घालावी.