विदर्भच नव्हे देश वाचवण्यासाठी एकत्र येण्याची वेळ - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले
संजय राठोड, यवतमाळ
गेल्या अनेक वर्षांपासून स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करण्याची मागणी केली जात आहे. आता स्वतंत्र विदर्भ आंदोलन समितीने विदर्भातील खासदाराना पत्र पाठवले असून, त्यात त्यांनी स्वतंत्र विदर्भ राज्यासंदर्भात भूमिका व्यक्त करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजप नेत्यांचा 'जुमलेबाज' म्हणत खरपूस समाचार घेतला.
राज्यात आणि केंद्रात सत्ता आल्यास स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती करण्यात येईल, असे आश्वासन2014 च्या निवडणुकीत देण्यात आले होते. प्रत्यक्षात विदर्भाचे मुख्यमंत्री त्यानंतर झाले. परंतु, विदर्भाला न्याय मिळाला नाही. यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या थांबल्या नाही. तत्कालीन मुख्यमंत्री यांनी यवतमाळ जिल्ह्यातील एका गावात मुक्काम केला. तरीदेखील शेतकऱ्यांच्या जीवनमानात कोणत्याही प्रकारचा फरक पडला नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाभाडी गावात येऊन शेतकऱ्यांना मोठी आश्वासने दिली. केवळ उद्योगपतींचे कर्ज माफ केले जात आहे. शेतकरी मात्र वाऱ्यावर आहे. खऱ्या अर्थाने हे सरकार जुमले बाज आहे. काँग्रेसने कधीही खोटी आश्वासन देऊन मते घेतली नाही. आता केवळ विदर्भ नाही तर देश वाचवण्याची वेळ आहे, असा हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर चढवला