“मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजनेला पुन्हा एकदा मुदतवाढ; 'या' तारखेपर्यंत करता येणार अर्ज
“मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजनेला पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात येणार आहे. राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्याची मुदत आता 15 ऑक्टोंबरपर्यंत वाढवली आहे. या योजनेचा लाभ आतापर्यंत ज्या महिलांना मिळाला नाही, त्यांच्यापर्यंत लाभ पोहचवण्यासाठी ही मुदतवाढ देणात आली आहे. यापूर्वी या योजनेत अर्ज करण्याची मुदत सप्टेंबर अखेरपर्यंत होती.
पण आता "मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण" या योजनेचे अर्ज करण्यासाठी 15 ऑक्टोबर 2024 च्या रात्री बारा वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. मात्र, हे अर्ज फक्त अंगणवाडी सेविकांमार्फतच भरण्यात येणार आहे.
राज्य सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना राबवली आहे. या योजनेच्या अंतर्गत महिलांना प्रत्येकी महिन्याला 1500 रुपये आर्थिक मदत म्हणून दिले जातात. या योजनेचे पाच हप्ते महिलांच्या खात्यावर जमा देखील झाले आहेत.
यातच आता राज्य सरकारने मुदतवाढीचा निर्णय घेतल्याने महिलांना पुन्हा एकदा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे आता महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात.