समृद्धी महामार्गावर तुम्हाला किती टोल भरावा लागणार? जाणून घ्या
समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा दिवाळीपासून सुरू होणार असल्याची माहिती मिळत आहे. तर या समृद्धी महामार्गावर प्रवास करताना टोल किती आकारला जाऊ शकतो याची चर्चा सध्या सुरु आहे. नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. समृद्धी महामार्ग हा 12 जिल्ह्यातून जाणार आहे. यामध्ये नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलढाणा, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक, ठाणे जिल्ह्यांचा समावेश आहे. समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनापूर्वी या महामार्गाच्या टोलची माहिती देणारा फलक महामार्गाच्या कडेला लावण्यात आला असून त्याचा फोटो सध्या व्हायरल होऊ लागला आहे. या फोटोमध्ये सर्व प्रकारच्या वाहनांसाठी नेमका किती टोल भरावा लागणार, यासंदर्भातली माहिती देण्यात आली आहे. टोलचे हे दर ३१ मार्च २०२५ पर्यंत अर्थात पुढील जवळपास तीन वर्षांसाठी लागू असतील, असंही या फलकावर नमूद करण्यात आलं आहे
समृद्धी महामार्गावर बस, ट्रकसाठी 5.85 रुपये प्रतिकिलोमीटर इतका टोल दर असणार आहे. मोटर, जीप, व्हॅन आदी हलकी मोटर वाहनांसाठी 1.73 रुपये प्रतिकिलोमीटर इतका टोल असणार आहे. तर, हलकी व्यावसायिक वाहने, हलकी मालवाहतुकीची वाहने अथवा मिनी बससाठी 2.79 रुपये प्रतिकिमी दर इतका टोल असणार आहे. तीन आसांच्या व्यावसायिक वाहनांसाठी 6.38 रुपये प्रतिकिलोमीटर इतका टोल असणार आहे. अवजड बांधकाम यंत्रसामग्री, अनेक आसांच्या वाहनांसाठी 9.18 रुपये आणि अतिअवजड वाहनांसाठी 11.17 रुपये प्रतिकिलोमीटर इतका टोल असण्याची माहिती मिळत आहे.
नागपूर ते मुंबई असा थेट 701 किमी अंतरासाठी जवळपास 1200 रुपयांचा टोल भरावा लागणार आहे. चार चाकी वाहनांसाठी समृद्धी महामार्गावर प्रतिकिलोमीटर 1.73 रुपये टोल आकारणी होणार आहे. 2025 पर्यंत हे टोल दर लागू असणार आहेत