औरंगाबाद खंडपीठाने महत्वाचा निर्णय दिला आहे. कन्नड-चाळीसगाव दरम्यानचा औट्रमघाट (कन्नड घाट) हा 11 ऑगस्टपासून काही अपवाद वगळता जड वाहतुकीसाठी पूर्णत: बंद करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे आणि न्या. वाय. जी. खोब्रागडे यांनी दिले.
कन्नड घाटाच्या वाहतूक कोंडीबाबत दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर शुक्रवारी सुनावणी झाली. वाहनांसाठी पर्यायी मार्गही खंडपीठाने सुचविला आहे. त्यामुळे आता औट्रमघाटातील वाहतूक कोंडीचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे. अॅड. ज्ञानेश्वर बागूल, अॅड. निलेश देसले आणि अॅड. श्रीकृष्ण चौधरी यांनी औरंगाबाद खंडपीठात एक जनहित याचिका दाखल केली होती.
या वाहनांमध्ये ट्रक, ट्रेलर, पेट्रोल डिझेलची वाहतूक करणारे टँकर, दूध टँकर यांचा समावेश आहे. यांना बंद करण्यात आले आहे. बंदी घालण्यात आलेल्या वाहनांसाठी औरंगाबाद- दौलताबाद टी पॉईंट- देवगाव रंगारी - शिऊर बंगला-वाकळा-पिंपरखेड-न्यायडोंगरी मार्गे चाळीसगाव हा रस्ता सुचविण्यात आला आहे.