लोकहिताच्या प्रकल्पांना स्थगिती नाहीच, पर्यटन मंत्र्यांनी प्रकल्पांबाबत दिली स्पष्टता
मुंबई : लोकहिताचे सर्व निर्णय अंमलात आणले जातील. पूर्वी सर्व निर्णयांना स्थगिती देण्यात आली होती. त्याची समीक्षा करण्यात आली असून पुढील काही दिवसांत सर्व कामांची अधिसूचना जारी करण्यात येईल, असं सांगत पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी लोकहिताच्या प्रकल्पाबाबत स्पष्टता दिली आहे.
लोढा म्हणाले, दुरूस्ती निदर्शनास आणून दिल्याने काही प्रकल्प थांबवण्यात आले होते. त्यामुळे तीन प्रकल्पांना दहा दिवसांची स्थगिती देण्यात आली होती. आता मात्र पुढील काही दिवसांत ते प्रकल्प देखील सुरू होतील, असं लोढांनी सांगितलं.
कोणताही प्रकल्प रद्द करण्यात आलेला नाही, असं देखील लोढांनी स्पष्ट केलं. ते म्हणाले, लोकहिताचे कोणतेही प्रकल्प थांबणार नाही. पर्यटन खात्याकडे मोठी संपत्ती मात्र तरीदेखील ते तोट्यात आहे. त्यामुळे त्याबाबत पॉलिसी नक्की करण्यात आली आहे.
ठाकरेंनी शेवटच्या टप्प्यात अनेक प्रकल्पांना मंजुरी दिली होती का? याबाबत विचारले असता याबाबत बोलण्यास लोढांनी नकार दिला. ते म्हणाले, लोकहिताचे निर्णय कोणत्याही सबबीवर थांबणार नाही. त्याला कोणी मंजूरी दिली, हे महत्वाचे नाही. त्या निर्णयाचं स्वरूप कसं आहे? त्यात लोकांचा फायदा असेल तर प्रकल्प नक्की होणार, असं देखील लोढांनी सांगितलं.
प्रकल्पांना स्थगिती देताना निर्णयाचं उल्लंघन झालं होतं का? यावर उत्तर देताना लोढा म्हणाले, माझ्याकडे तीन लोक आले होते. त्यांनी काही गोष्टी निदर्शनास आणून दिल्या. यामुळे त्या केसेस थांबविण्यात आल्या होत्या. लवकरच सर्व काही सुरळित होईल, असं आश्वासन लोढा यांनी यावेळी दिलं.
अजून कोणत्या निर्णयाकडं तुमचं लक्ष आहे? यावर बोलताना लोढा म्हणाले, असं काही विशेष नाही. मी माझं काम करतो. बारा महिन्यात बारा फेस्टिवल साजरे करण्याचं नक्की केलं आहे. आदिवासी, शीख, रायगड आणि मुंबई फेस्टिवल करू, असं देखील लोढा यांनी माहिती देताना सांगितलं.