Nagpur: विदर्भाची खास ओळख 'तान्हा पोळा'! नागपुरात तान्हा पोळा उत्साहात साजरा
'तान्हा पोळा' हा विदर्भाची खास ओळख आहे. लहान मुलांना बैलांचं महत्त्व समजावं म्हणून नागपूरचे दुसरे श्रीमंत राजे रघुजी महाराज भोसले यांनी सुरू या उत्सवाला सुरूवात केली. पूर्व विदर्भातील काही जिल्हांमध्ये पोळ्याच्या पाडव्याला लहान मुलांसाठी लाकडी नंदी बैलांचा 'तान्हा पोळा' भरवला जातो. यासाठी वर्षभर विविध प्रकारच्या लाकडापासून सुंदर व आकर्षक नंदी बैल तयार केले जातात. हे लाकडी नंदी बैल आता लकडगंजच्या लकडा मार्केटमध्ये विक्रीसाठी तयार आहेत. ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळत असल्यानं कारागीर आणि विक्रेते उत्साहित आहेत.
218 वर्षांपूर्वी म्हणजेच 1806 मध्ये 'तान्हा पोळा' उत्सव साजरा करण्याची परंपरा सुरू झाली. 'तान्हा' पोळा साजरा करण्याची परंपरा राजे रघुजी भोसले (दुसरे) यांच्या संकल्पनेतून सुरू झाली. लहान मुलांमध्ये बैलांबद्दल प्रेम निर्माण करण्याच्या उद्देशानं 'तान्हा पोळा' साजरा करण्यात येतो.
विविध सांस्कृतिक परंपरेनं नटलेल्या विदर्भात 'तान्हा' पोळा सणाला विशेष महत्त्व आहे. नागपूरसह विशेषतः पूर्व विदर्भातील अनेक जिल्यांमध्ये पोळा हा सण अतिशय वेगळ्या पद्धतीनं साजरा करतात. 'तान्हा पोळा' हा सण राज्याच्या इतर भागात ज्याप्रमाणे बैलपोळा साजरा केला जातो, त्याच प्रमाणे साजरा केला जातो. मात्र, विदर्भात 'तान्हा पोळा' साजरा करण्याची परंपरा आहे. लाकडापासून तयार केलेल्या नंदी बैलांची मिरवणूक काढली जाते, ही परंपरा गेल्या 217 वर्षांपासून आजही सुरू आहे.