अंतरवाली सराटीकडे जाणारा रस्ता पोलिसांकडून बंद; पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात
सुधाकर जाधव, जालना
अंतरवाली सराटीकडे जाणारा रस्ता पोलिसांकडून बंद करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरु आहे. आज मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. आज सकाळी 11 वाजता मनोज जरांगे पाटील पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेमध्ये ते काय बोलतात हे पाहणं महत्वाचे आहे.
यासोबतच मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला प्रतिउत्तर म्हणून मंगेश ससाणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे उपोषण सुरू आहे. ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी आणि कुणबी नोंदी रद्द करण्यासाठी त्यांचं उपोषण सुरू असल्याची माहिती मिळत आहे. आज त्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस असून सकाळी 11 : 30 वाजता ते पत्रकार परिषद घेणार आहेत.
मनोज जरांगे पाटील यांच्यापाठोपाठ लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हेसुद्धा उपोषण करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत. पत्रकार परिषद घेणार असून या पत्रकार परिषदेतून उपोषण संदर्भात घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
जालन्यात ओबीसी - मराठा संघर्षाची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर अंतरवाली सराटीकडे जाणारा रस्ता पोलिसांकडून बंद करण्यात आला असून वडीगोद्रीमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अंतरवाली सराटी फाट्यावर पोलिसांकडून बॅरिकेट्स लावून रस्ता बंद करण्यात आला आहे.