राज्यात 'लम्पी'चा धोका वाढला, पशुपालकांवर मोठं संकट, लाखो दुग्धवर्गीय जनावरांवर जीवघेण्या आजाराचं सावट
Team Lokshahi

राज्यात 'लम्पी'चा धोका वाढला, पशुपालकांवर मोठं संकट, लाखो दुग्धवर्गीय जनावरांवर जीवघेण्या आजाराचं सावट

'लम्पी' आजार म्हणजे काय?, आणि काय आहेत 'लम्पी'ची लक्षणे जाणून घ्या!
Published by :
Team Lokshahi
Published on

शुभम शिंदे (अँकर, बुलेटिन प्रोड्युसर) : देशभरात सध्या लम्पी आजाराने थैमान घातल्याचं पाहायला मिळतंय. अनेक जनावरे या रोगाने दगावताय. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांची काळजी घेणं महत्वाचं आहे. हा रोग संसर्गजन्य असल्याने एका जनावराकडून दुसऱ्या जनावराला याची लागण होतेय. राज्यात लम्पीचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारही आता अलर्ट मोडवर आल्याचं पाहायला मिळतंय कारण, लम्पीमुळे उत्त्तरेकडील राज्यांमध्ये हजारो जनावरांचा मृत्यू झालाय त्यामुळे पशुपालकांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय. महाराष्ट्रावरही हे संकट दूर नाहीये राज्याच्या अनेक भागात जनावरांना या आजाराची लागण झालीय.

राज्य सरकारची खबरदारी

राज्यात आतापर्यंत 32 जनावरांचा लम्पीमुळे मृत्यू झालाय. लम्पीचा वाढता धोका लक्षात घेता राज्यातील जनावरांचे सर्व व्यापार तातडीने बंद करण्यात आलेत. राज्यात 1 कोटी 96 लाख जनावरे आहेत त्यामुळे सरकारने सर्व पशुवैद्यकीय दवाखान्यांना सूचना जारी केल्यात. पशुसंवर्धन आणि दुग्धविकास विभागानेही उपाययोजना राबवण्यास सुरुवात केलीय. मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील त्यांनी विभागाला आवश्यक त्या खबरदारीच्या सूचना दिल्याची माहिती दिलीय. या आजाराने जर शेतकऱ्यांचं नुकसान झालं तर त्यांना मदतीची घोषणा करण्यात आलीय. मृत जनावरांसाठी शेतकऱ्यांना प्रत्येकी 10 हजारांची मदत सरकारने घोषित केलीय.

लम्पी आजाराविषयी

1929ला दक्षिण आफ्रिकेत या रोगाचा शोध लागला अर्थातच प्रथमतः आढळून आला. 2012-13 नंतर लम्पी रोग भारतात आढळला. भारतात राजस्थान, पंजाब, गुजराज, हरियाणा, हिमाचल प्रदेशात हा आजार आढळला. आता महाराष्ट्रातही याचा प्रादुर्भाव झालाय. हा आजार फक्त जनावरांमध्ये आढळतो. बाधित जनावरांच्या संपर्कात आलं तरी मनुष्याला या आजाराची लागण होत नाही. त्यामुळे बाधित जनावरांवर उपचार करताना घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही.

लम्पी आजार म्हणजे काय ?

  • लम्पी हा एक त्वचारोग आहे.

  • प्रामुख्याने जनावरांमध्ये लम्पी आढळतो.

  • 1929ला दक्षिण आफ्रिकेत या रोगाचा शोध.

  • 2012-13नंतर लम्पी रोग भारतात आढळला.

  • महाराष्ट्रात गडचिरोलीत या रोगाची सुरुवात.

  • लम्पी हा संसर्गजन्य रोग.

  • एका जनावराकडून दुसऱ्या जनावराला लागण.

  • गायींना लम्पी रोगाची जास्त लागण.

  • कमी वयाच्या जनावरांमध्ये रोगाची तीव्रता जास्त.

  • संकरित जनावरांमध्ये या रोगाचा जास्त प्रादुर्भाव.

  • बाधित जनावरांचा मृत्यू झाला खोल खड्डयात मृतदेहाची विल्हेवाट लावावी.

  • मृत जनावरांच्या ज्या खड्ड्यात पुरणार तिथे चुन्याची पावडर टाकावी.

लम्पी आजाराची लक्षणे कोणती?

  • जनावराला ताप येतो.

  • जनावरे चारा-पाणी कमी करतात.

  • एक-दोन दिवसात अंगावर गाठी येतात.

  • या गाठी संपूर्ण शरीरावर पसरतात.

  • जनावरांच्या पायाला सूज येते.

  • परिणामी जनावरे दगावतात.

  • वेळेत उपचार केल्यास आजाराचा धोका कमी.

जनावरांमध्ये या आजाराची लक्षणे आढळल्यास जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी किंवा जनावरांच्या डॉक्टरशी संपर्क साधा. त्याआधी बाधित जनावरांचं इतर जनावरांपासून विलगीकरण करा. जनावरांसाठीची योग्य ती कीटकनाशकांची फवारणी करावी. डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषधोपचार करावे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com