पंतप्रधान नरेंद मोदींच्या सभेवर पावसाचे सावट; सभेचे ठिकाण बदलले जाण्याची शक्यता
अमोल धर्माधिकारी, पुणे
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर येणार आहेत. पुण्यातील पहिला भूमिगत मेट्रो प्रकल्पाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज करण्यात येणार आहे. याच निमित्ताने जिल्हा सत्र न्यायालय या मेट्रो स्टेशन ठिकाणी पोलिसांकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या भूमिगत मेट्रो मार्गाने प्रवास करणार आहेत. मोदींच्या स्वागतासाठी मेट्रो प्रशासनाकडून तयारी पूर्ण झालेली पाहायला मिळत आहे.
एसपी कॉलेजच्या मैदानात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे. या सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलतात हे पाहणं महत्वाचं आहे. पुण्यात मुसळधार पाऊस पडत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुण्यातील सभास्थळी पावसाचं पाणीच पाणी झाल्याचं पाहायला मिळत आहे. एसपी कॉलेज मैदानावरच्या सभास्थळाचं तळं झाल्याचं पाहायला मिळत आहे. एसपी मैदानावर पावसामुळं चिखल झाला आहे. मुसळधार पावसामुळे मैदानावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.
याच पार्श्वभूमीवर गरज पडल्यास पंतप्रधान मोदींच्या सभेचे ठिकाण बदलले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच पर्यायी सभास्थळ असण्याची शक्यता आहे. पाऊस आणि हवामान तपासल्यानंतर आयोजकांकडून निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.