मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी निघालेल्या रिफायनरी विरोधकांच्या गाड्या पोलिसांनी अडवल्या
निसार शेख,रत्नागिरी : बारसू रिफायनरी प्रकल्प विरोधक मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी रत्नागिरीत जात असताना भाट्ये पुलावर पोलिसांनी त्यांच्या गाड्या रोखल्या आहेत. तीन गाड्या अडवून त्या सर्व विरोधकांना पावस पोलीस चौकीत बसविण्यात आले आहे. संगीत रजनीचा इव्हेंट करून लोक जमवत जाहिर सभा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना रिफायनरी प्रकल्पग्रस्तांना भेटायला वेळ नसल्याचे दिसून येत आहे.
मुख्यमंत्र्यांकडे वारंवार बैठकीची मागणी करूनही रिफायनरी विरोधकांना वेळ मिळालेली नाही. त्यामुळे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रत्नागिरीत असल्याने बारसू रिफायनरी विरोधक त्यांना भेटण्यासाठी रत्नागिरीला निघाले होते. त्यावेळी त्यांच्या तीन गाड्या भाट्ये पुलावर पोलिसांनी अडवल्या. त्या सर्व कार्यकर्त्यांना पावस पोलीस चौकीत बसवून ठेवण्यात आले आहे. रत्नागिरी दौऱ्यात मुख्यमंत्री यांनी एसटी कर्मचारी,मच्छिमार,आंबा बागायतदार,भाजप पदाधिकारी यांना भेटण्यासाठी राखीव वेळ ठेवला आहे. मात्र रिफायनरी विरोधकांना भेटण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वेळ नाही.