सिंधुदुर्गात घरफोडीचं प्रमाण वाढलं, खाकी वर्दीचा वचक संपला...?
प्रसाद पाताडे | सिंधुदुर्ग : दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असून घर फोडया, चोऱ्या, बलात्कार, विनयभंग, महिलांवरील अत्याचार याचे वाढलेले प्रमाण पाहता जिल्ह्यात "खाकी" वर्दीची भीती आणि गुन्हेगारीवरील चाप नाहीसा झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शांत जिल्हा म्हणून ओळख असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाढत्या गुन्ह्यांसमोर खाकी ओशाळलेली दिसत आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याची शांत जिल्हा म्हणून ओळख आहे. जिल्ह्यातील घरफोड्या, चोऱ्यांचे प्रमाण पाहता चोरट्यांना पोलिसांचा धाक उरलेला नाही. जिल्ह्यात दर चार दिवसांनी चोरी, घरफोडीची एकतरी घटना घडल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्याची पोलीस यंत्रणा चोरट्यांसमोर हतबल झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गेल्या तीन वर्षातील गुन्ह्यांची माहिती घेतली असता जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या गुन्ह्यामध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मात्र पोलीस प्रशासनाला जास्तीत जास्त गुन्हे उघड करण्यात यश आले आहे .गुन्हे उघड करण्याचे प्रमाण सरासरी ९० टक्के हून अधिक आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या वर्षभरात विविध प्रकारचे १८७० गुन्हे दाखल झाले असून त्यापैकी १६८० गुन्हे उघड करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. गेल्या तीन वर्षाचा आढावा घेतला असता गेल्या दोन वर्षाच्या तुलनेत यावर्षी चोऱ्या, घरफोड़या, बलात्कार, विनयभंग, अपहरण आणि पोक्सो कायद्यान्वये दाखल गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे. जिल्ह्यातील गुन्हेगारीचे प्रमाण पाहता जिल्हा गुन्हेगारीचे नंदनवन बनला असल्याचे भासत आहे.
चोरटे सरसावले पोलीस डागाळले
सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुकाने, घरे, बंगले फोडून लाखो रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. भरवस्तीत चोऱ्या करून चोरट्यानी पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे. जिल्ह्यातील विविध भागात होणाऱ्या चोऱ्यांमुळे पोलीस प्रशासनाची झोप उडाली आहे. पोलिसांची रात्रीची गस्त व्यर्थ ठरवत चोरटे सरसावले असून यामुळे पोलिसांची प्रतिमा डागाळली आहे.
पायी गस्तीची गरज
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मोठ्या बाजारपेठामध्ये पोलिसांची गस्त (पेट्रोलिंग) सुरू असते. तरीही चोरट्यांकडून दुकाने, घरे, बंगले फोडून लाखो रुपयांची चोरी केली जाते. सद्यस्थितीत पोलिसांची गस्त वाहनातून होते. पोलीस गस्त रस्त्यावर आणि चोरटे फिरतात वस्त्यांवर असा लपंडाव जिल्ह्यात सुरू आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे पोलिसांची पायी गस्त वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे.
गुन्हे उघड होण्याचे प्रमाण वाढले
जिल्ह्यात गुन्ह्यांचे प्रमाण वाढलेले दिसत असले तरी दाखल गुन्ह्यापैकी ९० टक्के गुन्हे उघड करून संबंधित आरोपींना गजाआड करण्यात जिल्हा पोलीस प्रशासनाने यश मिळवलेले आहे. खून, खूनाचा प्रयत्न, दरोडा यासारखे गुन्हे १०० टक्के उघड करून आरोपींना गजाआड केले आहे.
पोलीस अधीक्षकांची भूमिका महत्त्वाची
सिंधुदुर्ग जिल्ह्यात चोरट्यानी थैमान घातले आहे. पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे. जिल्हा वाशियांमध्ये वाढत्या चोरांच्या घटनांमुळे घबराटीचे वातावरण पसरले आहे. तसेच गुन्हेगारीचे प्रमाणही वाढले आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी व चोरट्यांना पोलिसांचा धाक निर्माण व्हावा यासाठी पोलीस अधीक्षकांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.