नव्या पाक लष्करप्रमुखांनी भारताविरोधात ओकली गरळ! म्हणाले, लढण्यासाठी तयार
नवी दिल्ली : पाकिस्तानचे नवनियुक्त लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी पदाची सूत्रे हाती घेताच भारताविरोधात गरळ ओकण्यास सुरुवात केली आहे. आपल्या देशावर हल्ला झाल्यास पाकिस्तानी सशस्त्र सेना 'आपल्या मातृभूमीच्या प्रत्येक इंचाचे रक्षणच करणार नाही तर शत्रूशीही लढेल', असे त्यांनी म्हटले आहे. नियंत्रण रेषेवरील (एलओसी) राखचिक्री सेक्टरमधील सीमावर्ती भागाच्या पहिल्या भेटीदरम्यान मुनीर यांनी हे वक्तव्य केले.
पाकिस्तानात सत्तापालट झाल्यानंतर सलग दोन-तीन वर्षे कमर जावेद बाजवा यांनी लष्करप्रमुख म्हणून काम केल्यानंतर ते आता निवृत्त झाले आहेत. त्यांची जागा 24 नोव्हेंबर रोजी जनरल मुनीर यांनी घेतली. यानंतर मुनीर यांनी पाकिस्तानी अधिकारी आणि सैनिकांशी संवाद साधला. यावेळी जम्मू-काश्मीर आणि गिलगिट-बाल्टिस्तानबाबत भारतीय अधिकाऱ्यांच्या अलीकडच्या काही वक्तव्यांवरही त्यांनी भाष्य केले.
असीम मुनीर म्हणाले की, कोणताही गैरसमज जो गैरसमजात बदलतो त्याचा सशस्त्र दल नेहमीच पूर्ण ताकदीने सामना करेल. आम्ही अलीकडेच गिलगिट बाल्टिस्तान आणि जम्मू-काश्मीरवर भारतीय नेतृत्वाची अत्यंत बेजबाबदार विधाने पाहिली आहेत. पण, आपल्या मातृभूमीच्या प्रत्येक इंचाचे रक्षण करण्यासाठी पाकिस्तानचे सशस्त्र दल शत्रूशी लढण्यास सदैव तयार आहे, असेही त्यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, काश्मीरचा मुद्दा आणि पाकिस्तानकडून होणार्या सीमेपलीकडील दहशतवादावरून भारत आणि पाकिस्तानमधील संबंध ताणले गेले आहेत. भारताने घटनेतील कलम 370 रद्द केल्यानंतर, जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध बिघडले. भारताच्या निर्णयावर पाकिस्तानकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली.