Ayodhya Ram Mandir : अयोध्येत आज होणार राम मंदिराच्या गाभाऱ्याची पायाभरणी
उत्तर प्रदेशातील अयोध्येत भगवान श्री राम मंदिराच्या (Ayodhya Ram Mandir) उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. त्याअंतर्गत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज राम मंदिराच्या गाभाऱ्याची पायाभरणी करणार आहेत. गाभाऱ्यातला पहिला दगड लावण्याचा समारंभ आज पार पडणार आहे. या समारंभात योगी आदित्यनाथ सहभागी होणार आहे. या मंदिराची पायाभरणी पंतप्रधान मोदींच्या हस्ते झाली होती.
या कार्यक्रमासाठी देशाच्या विविध भागातून अनेक साधूसंत-महंतांना आमंत्रण देण्यात आलं आहे. अयोध्येतल्या या राम मंदिराच्या उभारणीला चांगलाच वेग आलेला आहे. ५ ऑगस्ट २०२० रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मंदिराची पायाभरणी केली होती. तेव्हापासून हे बांधकाम सुरू आहे.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाकडून निर्णय आल्यानंतर श्री राम मंदिराची उंची आणि भव्यता वाढवण्याची मागणी होऊ लागली. यानंतर श्री राम मंदिराचे मॉडेल बदलताना इतरही काही बदल करण्यात आले. त्यामुळे मंदिरात बसवलेल्या दगडांची संख्याही वाढवण्यात आली.