रुग्णाच्या मदतीला घनदाट जंगलातून धावले प्रशासन...!
अनिल ठाकरे | चंद्रपूर : गोंडपीपरी तालुक्यातील तोहोगावला पुराने वेढा दिला आहे. येण्या-जाण्याचे मार्ग बंद झालेत. अश्या बिकट स्थितीत वाघाडे कुटूंबावर संकट कोसळलं. कुटूंबातील साहिल कालिदास वाघाडे या मुलाला मेंदुज्वर झाला. आरोग्य खालावले. तोहोगाव आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकार्यांनी रूग्णाला तात्काळ जिल्हा रूग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. मात्र रूग्णाला न्यायच कसं ? हा मोठा प्रश्न कुटूबाला पडला. अश्या बिकट स्थितीत गाव धावून आला. गावाचे सरपंच फिरोज पठाण यांनी गोंडपिपरीचे तहसिलदार के.डी.मेश्राम यांना भ्रमणध्वनीने संकटाची माहीती दिली. तहसीलदारानी वेळ न घालविता कन्हाळगाव अभयारण्यातील कन्हाळगाव कॅम्प नंबर चार या घनदाट मार्गे रूग्णवाहीका घेऊन धाव घेतली.मात्र या मार्गावर झाड कोसळले होते. त्यामुळं वाहन पुढे जावू शकत नव्हते. अखेर रूग्णवाहीका माघारी फिरले. हे कळताच कुटूबाची धाकधूक वाढली.
कोठारी पोलीस स्टेशनचे ठाणेदार तुषार चव्हाण यांनी पोलीस जवानांना सोबत घेतले. सोबत वनविकास महामंडळाचे वनकर्मचारी होते. या दोन्ही विभागातील कर्मचाऱ्यांनी मार्गातील कोसळलेले झाड हटविले. अन मार्ग मोकळा केला. तिकडे मार्ग मोकळा झाल्याची माहीती मिळताच कुटूंबाना आनंद झाला. कोठारी ठाणेदार चव्हाण यांनी डोग्यांने गाव गाठले. आणि रूग्णाला घेऊन चार नंबर मार्ग गाठला. ईकडे तहसिलदार के.डी.मेश्राम यांनी रूग्णवाहीकेने घटनास्थळ गाठले. रूग्णाला जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले आहे. तालुका प्रशासनाचा या धाडसी कामगीरीचे कौतुक होत आहे.