विनायक मेटेंच्या अपघाताची चौकशी होणार, मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश!
शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचं अपघाती निधन झालं आहे. वयाच्या 52व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पहाटे साडेपाचच्या सुमारास त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला असून पुणे ते मुंबई प्रवास करताना मेटे यांचे वाहन अनोळखी वाहनावरती आदळल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. अपघातानंतर जवळपास एक तासभर मेटे यांना कुठलीही मदत मिळाली नव्हती. यानंतर मेटे यांना नवी मुंबईतील एमजीएम दाखल करण्यात आलं होतं. गाडीच्या डाव्या बाजूचा चक्काचूर झाला आहे. मेटे यांच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली होती. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु होते.
मेटेंच्या निधनानंतर महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त केला जात आहे. विनायक मेटे यांच्या कुटुंबियांची कामोठेच्या एमजीएम रुग्णालयात भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “ही अत्यंत दुर्दैवी घटना असून राज्य सरकार विनायक मेटे यांच्या कुटुंबासोबत आहे” “या वृत्तावर माझाही विश्वास बसला नाही. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सातत्याने ते संघर्ष करत होते. त्यांनी अनेक आंदोलनं केली. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचेही ते अध्यक्ष होते. मला ते ३-४ दिवसांपूर्वी देखील भेटले होते. त्यांचा एकच ध्यास होता की आता तुम्ही दोघं आहात. त्यामुळे मराठा समाजाला न्याय मिळेल. आज आम्ही एक महत्त्वाची बैठक बोलावली होती. पण दुर्दैवाने त्यांचं दु:खद निधन झालं आहे. सरकार त्यांच्या परिवारासोबत आहे. विनायक मेटेंच्या पत्नीवर देखील दु:खाचा डोंगर कोसळला आहे”
यासोबतच मुख्यमंत्री म्हणाले की, मेटेंच्या सहकाऱ्याने घटनास्थळी मदत पोहोचली नसल्याचा आरोप केल्यानंतर मुख्यमंत्री म्हणाले. “आरोपांच्या बाबतीतील माहिती तपासून घेतली जाईल. पण ही झालेली घटना दुर्दैवी आहे. या घटनेची चौकशी वगैरे या सगळ्या गोष्टी होतील” असे सांगितले.