ते ट्विटर हँडल बोम्मईंचे नाहीच, बोम्मईंच्या ट्विटर अकाऊंटबद्दल अमित शाह, CM शिंदेंचा धक्कादायक दावा
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद गेल्या काही दिवसांपासून अधिकच चिघळत चालला आहे. या सीमावादाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कर्नाटक आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक घेतली. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
यावेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या ट्विटर अकाऊंटबद्दल धक्कादायक दावा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला आहे.त्यावेळी ते ट्विटर हँडल माझे नसल्याचे उत्तर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. शिवाय, सर्वांनी मिळून, कुठलेही पक्षीय राजकारण न करता मराठी माणसांच्या पाठीशी उभे रहायला हवे, असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी केले.
शिंदे म्हणाले की, “हे माझे स्टेटमेंट नाही, ते ट्विटर हँडल माझे नाही. आपण असे कुठलेही स्टेटमेंट केलेले नाही. त्यामुळे यात कुणी तरी आगीत तेल ओतण्याचे काम करत आहे. मराठी माणसांच्या भावनांशी खेळण्याचा कुणीही प्रयत्न करू नये. शेवटी सर्वांनी मिळून, कुठलाही पक्षीय राजकारण न करता मराठी माणसांच्या पाठीशी उभे रहायला हवे. त्यांना अधिकात अधिक काय सहकार्य करता येईल, यावर विचार करायला हवा. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आक्रमक ट्वीट केल्यानंतर सीमाभागांत तणाव वाढला. मात्र, बनावट ट्विटर खात्यावरून विधाने प्रसारित झाल्याचा दावा बोम्मई यांनी बैठकीत केला. मात्र आता ज्या ट्विटर अकाऊंट्सवरुन ही ट्वीट केली गेली ती खोटी असल्याचा दावा केंद्रीय गृहमंत्र्यांबरोबरच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनीही केला आहे. ही खाती उघडणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करून तातडीने कारवाई केली जाईल, अशी ग्वाही शहांनी दिली.