ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आमदार बांगरांचा ताफा वेशीवरच अडवला
ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांचा ताफा वर्षानुवर्ष गावात भरत असलेली जत्रा ही सर्वधर्मीयांसाठी आहे, इथे राजकारणाला थारा नाही, असे म्हणत गावाच्या वेशीवरच अडवला आहे. यावेळी दोन्ही गट आमने-सामने आल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले. अखेर गावकऱ्यांनी मध्यस्थी करत बांगर यांना दर्शनासाठी जाण्यास मार्ग मोकळा करून दिला.
कळमनुरी तालुक्यातील वारंगा मसाई येथे सध्या येथील कुलदैवत देवी मसाई मातेची यात्रा सुरू आहे. या यात्रेनिमित्त देवीच्या दर्शनासाठी आज कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर हे वारंगा मसाई येथे आले होते. माजी पंचायत समिती सदस्य अशोकराव करे यांनी विरोध दर्शविला. देवीची यात्रा हा आमच्या गावातील धार्मिक कार्यक्रम असून या कार्यक्रमाला राजकीय स्वरूप येऊ नये यासाठी अशोकराव करे यांनी त्यांना दर्शन घेऊ नये, अशी विनंती केली होती.
गावकऱ्यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. आमदार संतोष बांगर हे लोकप्रतिनिधी असून त्यांनी गावातील शांतता राखण्यासाठी प्रयत्न म्हणून मध्यस्थी केली असती तर तणावाचं वातावरण निर्माण झाले नसते, अशा चर्चा गावकऱ्यांमध्ये सुरु होत्या.
मात्र वारंगा मसाई गावातील ग्रामस्थांनी गावातील मसाई मातेची यात्रा हा धार्मिक कार्यक्रम असून यामध्येही कसल्याही प्रकारचं राजकारण नको म्हणत संतोष बांगर यांना दर्शन घेण्याला होणारा विरोध सामोपचारानं मिटवला. त्यानंतर आमदार संतोष बांगर यांनी मसाई मातेचं दर्शन घेतलं.