TET घोटाळ्यात सत्तारांचं नाव, ED तपास अन् मंत्रीपद गेल्याची चर्चा; योगा-योग की करेक्ट कार्यक्रम?
एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यापासून मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा जोरात सुरू होती. अखेर शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहुर्त ठरला आहे. उद्या सकाळी 11 वाजता मंत्रिमंडळ विस्तार होणार असून शपथविधी पार पडणार आहे. दरम्यान, या मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. ही सर्व लगबग सुरु असतानाच आता एक नवं प्रकरण समोर आलं आहे. टीईटी परीक्षा पेपरफुटी प्रकरणी औरंगाबादचे माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या दोन्हीही मुलींच्या नावाचा समावेश असल्याचे समोर आलं आणि राज्यात एकच खळबळ उडाली आहे. यावर आता अब्दुल सत्तार यांनी प्रतिक्रिया दिली असून आमची चूक असेल तर शिक्षा करा, असं म्हंटलं आहे. मात्र एकीकडे मंत्री मंडळ, शपथविधी वगैरे वगैरे चर्चा सुरु असताना अचानक अब्दुल सत्तार यांचं नाव टीईटी प्रकरणात कसं आलं? असा प्रश्न निर्माण होतोय.
टीईटी परीक्षेमध्ये अब्दुल सत्तार यांच्या मुलींची नावं आली असता त्यांनी आमची जर चूक असेल तर आम्हाला शिक्षा करा. मात्र, आम्ही चुकी केली नसून राजकीय द्वेषापोटी आम्हाला बदनाम करण्यात येत आहे, असा आरोप केला आहे. माझ्या मुली 2017 मध्येच संस्थेत नोकरीला लागल्या होत्या. त्यानंतर मुलींनी 2020 मध्ये परीक्षा दिली होती. तेव्हा माझ्या मुली या नापास झाल्या होत्या. परंतु, जर आम्ही फायदा घेतला असेल तर कारवाई करा. मात्र, कोणी जाणीवपूर्वक द्वेष पसरवण्यासाठी खोटी माहिती पसरवत असतील तर त्यांना फासावर लटकवा, अशीही मागणी सत्तार यांनी केली आहे.
राजकीय षडयंत्र?
अब्दुल सत्तार हे शिवसेनेत येण्यापूर्वी काँग्रेसमध्ये होते. त्यानंतर त्यांना भाजपमध्ये प्रवेश करायचा होता, मात्र सिल्लोड भाजपमध्ये त्यांना विरोध होत असल्यानं आणि महायुतीच्या काळात सिल्लोड मतदार संघ शिवसेनेला सुटणार होता, त्यामुळे त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याचं सांगण्यात येतं. त्यानंतर आता सत्तार यांनी पुन्हा एकदा शिवसेनेलाही सोडचिठ्ठी देत शिदे गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला. मागच्या काही दिवसांपासून सत्तार यांना मंत्रीपदाचे डोहाळे लागले आहेत. त्यासाठी त्यांच्या काही दिल्ली वाऱ्या देखील झाल्याचं दिसून आलं आहे. मात्र अब्दुल सत्तार यांचा आतापर्यंतचा राजकीय प्रवास पाहिला असता, त्यांना मंत्री पद न मिळाल्यास ते काहीही करु शकतात अशी शक्यता सहज लक्षात येते. सध्या शिंदे गट आणि भाजपला सरकार बनवण्यासाठी कोणताही अडथळा नको आहे. तसंच दोन तृतीयांश आमदार शिंदे गटात असणं देखील तेवढंच महत्वाचं आहे. त्यामुळे सत्तार किंवा इतर कोणीही पुन्हा नाराजीचा सूर आळवू नये किंवा तशी हिम्मतच करु नये म्हणून टीईटी घोटाळ्यात त्यांचं नाव येईल असं षडयंत्र रचण्यात आल्याची शक्यता आहे.
लॉकडाऊननंतर शिक्षक पात्रता भरती घेण्यात आली होती. त्यावेळी त्यामध्ये काही उमेदवारांनी केलेल्या तक्रारीनंतर TET घोटाळा उघडकीस आला. यानंतर या प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांकडे होता. हे प्रकरण राज्य सरकारच्या यंत्रणांकडून तपासलं जात होतं. मात्र आज एकीकडे अब्दुल सत्तार यांचं नाव या प्रकरणात आलं आणि दुसरीकडे या प्रकरणाचा तपास ED कडे गेल्याचं समोर आलं.
वरचा सर्व प्रकार हा केवळ योगा योग आहे की अब्दुल सत्तार यांचा करेक्ट कार्यक्रम हे सध्या सांगणं कठीण आहे. उद्याच्या मंत्री मंडळ विस्तारामध्ये याचं उत्तर स्पष्ट होईल. कारण देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळात साफ प्रतिमा असलेल्या लोकांनाच संधी मिळेल अशी चर्चाही दुसऱ्या बाजुला सुरु आहे. त्यामुळे सत्तार यांचं नाव आता मंत्री मंडळाच्या यादीतून वगळण्यासाठी टीईटी प्रकरण पुरेसं ठरणार असल्याचं दिसतंय.
दरम्यान, सत्ता स्थापन झाल्यानंतर सव्वा महिना उलटूनही मंत्रिमंडळ विस्तार झाला नसल्याने विरोधकांकडून शिंदे सरकारला लक्ष्य करण्यात येत होते. परंतु, अखेर शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहुर्त मिळाला असून उद्या सकाळी 11 वाजता मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती मिळत आहे. तर, उद्याच मंत्र्यांचा शपथविधीही पार पडणार आहे. यासाठी मुख्यमंत्री शिंदे आज राज्यपालांची भेट घेणार आहेत. 15 ते 16 आमदारांचा शपथविधी होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. व 10 ते 17 ऑगस्ट दरम्यान पावसाळी अधिवेशन होण्याची शक्यता आहे.