टेस्ला उभारणार गुजरातमध्ये प्रकल्प; नवीन वर्षात होणार घोषणा
नवी दिल्ली : जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनी टेस्ला पुढील वर्षी जानेवारीमध्ये भारतात लॉन्च होऊ शकतो. गुजरातमधील गांधीनगर येथे होणारा व्हायब्रंट गुजरात समिट 2024 दरम्यान टेस्ला कंपनीची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. यावेळी टेस्लाचे सर्वेसर्वा सीईओ आणि संस्थापक एलोन मस्क भारतात उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
टेस्लाने भारतातील गुंतवणूक योजनांचा पुनर्विचार करत असल्याचे संकेत दिले होते. टेस्लाने एक वर्षापूर्वी भारतात जास्त आयात शुल्कामुळे भारतात गुंतवणूक न करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, या वर्षाच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यूएस दौऱ्यादरम्यान एलोन मस्क यांची भेट घेतली होती. यावेळी अलीकडेच केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनीही अमेरिकेतील टेस्ला प्लांटला भेट दिली.
गुजरात समाचार आणि इतर प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, टेस्लाचा उत्पादन कारखाना साणंदमध्ये असण्याची शक्यता आहे. याच ठिकाणी टाटा मोटर्ससारख्या कार उत्पादक कंपन्या आहेत. इतर भारतीय कार उत्पादक जसे की मारुती सुझुकी आणि एमजी मोटर यांचेही गुजरातमध्ये प्लांट आहेत. टेस्ला कंपनीचे अधिकारी आणि गुजरात सरकार यांच्यातील चर्चा अखेरच्या टप्प्यात आली आहे. टेस्ला व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिटमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षरी करेल, अशी शक्यता आहे.
दरम्यान , गुजरातमध्ये वाहन उत्पादन केल्यानंतर ते बंदरमार्गे इतर देशांत निर्यात करण्याची टेस्लाची योजना आहे. गुजरातमधील कांडला-मुंद्रा बंदर साणंद सारख्या ठिकाणी असल्याने निर्यातीत मदत होऊ शकते. तथापि, टेस्लाच्या आगामी भारत उत्पादन संयंत्रासाठी सानंद अद्याप निश्चित झालेले नाही. पण गुजरात सरकारने बेचराजी आणि ढोलेरासारख्या ठिकाणीही जमीन देऊ केल्याची माहिती आहे.