मुंबई, ठाण्यात पारा घसरला, पुढील तीन महिने चांगल्या थंडीचे
मुंबई आणि ठाण्याच्या तापमानातही घट झाली आहे. ऑक्टोबर हिटने त्रासलेल्या मुंबईकरांना आज अखेर थंडीने दिलासा मिळाला आहे. मंगळवारी मुंबईचे किमान तापमान 16 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं आहे. या हंगामातले आतापर्यंतचे हे निचांकी किमान तापमान आहे.
मंगळवारी सांताक्रूझ केंद्रात १६.८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. कुलाबा केंद्रावर किमान तापमान स्थिर असून तिथे मंगळवारी २२.५ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. ठाणे जिल्ह्यात थंडी वाढली आहे. मंगळवारी ठाणे जिल्ह्यात सरासरी १४ अंश सेल्सिअस तर किमान १३.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. पनवेल, पलावा, उल्हासनगर, कल्याण या शहरांमध्ये १४ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे. तर डोंबिवली, नवी मुंबई आणि ठाणे शहरात सरासरी १५ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले.
थोडक्यात
पुढील तीन महिने चांगल्या थंडीचे
चक्रीवादळाचा काळ संपल्यामुळे हिवाळ्याला पोषक स्थिती
मुंबई, ठाण्यात पारा घसरला
बंगालच्या उपसागरात चक्रीवादळे तयार होण्याचा अति उच्च काळ संपला आहे. प्रशांत महासागरात ला-निना सक्रिय होण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर महिन्यात हिमालय आणि हिमालयाच्या रांगांमध्ये अपेक्षित बर्फवृष्टी झाली आहे. थंडीसाठी पोषक स्थिती निर्माण झाल्यामुळे डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत चांगली थंडी पडण्याचा अंदाज आहे.साधारपणे १५ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर हा बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार होण्याचा अति उच्च काळ असतो. डिसेंबरमध्ये चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता कमी असल्याने उपसागरातून जमिनीवर बाष्पयुक्त वारे येऊन थंडी कमी होण्याची फारशी शक्यता नाही. डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी अखेरपर्यंत देशात चांगली थंडी पडण्याचा अंदाज आहे.
नगरमध्ये पारा ९.२ अंशांवर
नगरमध्ये मंगळवारी राज्यात सर्वांत कमी ९.७ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. यंदाच्या हंगामात राज्यात पारा एका अंकावर घसरण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्याखालोखाल पुण्यात १०.८, जळगावात ११.०, सातारा १२.९, औरंगाबादेत १२.१, परभणीत १२.०, नागपुरात १२.० आणि गोंदियात १२.२ आणि अलिबागमध्ये १६.६ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे.