CWG 2022 : अधिकाऱ्यानं मैदानात तिरंग्यासोबत झळकवला तेलंगणाच्या मुख्यमंत्र्याचा फोटो
भारताची स्टार महिला बॉक्सर निखत जरीनने रविवारी बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलं. यावेळी तिच्या यशानं संपूर्ण देशाने आनंद व्यक्त केला. महिलांच्या 50 किलो गटात सुवर्णपदक जिंकल्यानंतर जरीनने तिरंगा फडकावून अभिमानाने जगाला आपलं देशावर प्रेम असल्याचा संदेश दिला. मात्र कार्यक्रमस्थळी तेलंगणा राज्याचे क्रीडा प्राधिकरणाचे अध्यक्ष ए. वेंकटेश्वर रेड्डी हे निखत जरीन ऐवजी तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांचा फोटो झळकवताना दिसले. यापूढे जात त्यांनी फक्त फोटो झळकवला असता तर गोष्ट वेगळी होती. मात्र त्यांनी थेट तिरंग्यासमोर धरुन हा फोटो झळकवला.
देशाचं नाव उंचावणाऱ्या खेळाडूंच्या विजयाचा आनंद साजरा करण्याऐवजी तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांचं चित्र झळकवण्यामागे नेमकं काय कारण आहे? असा सवाल आता उपस्थित होतोय. यासंदर्भात सोशल मीडियावर त्यांच्यावर टीका केली जातेय. हैद्राबाद येथील निखत जरीनने अंतिम फेरीत उत्तर आयर्लंडच्या कार्ली एमसी नॉलचा 5-0 असा पराभव करून सुवर्णपदक जिंकलं. बर्मिंगहॅममध्ये हे आजच्या दिवसातलं भारताचं चौथं सुवर्ण आणि आतापर्यंत 17 वं सुवर्ण पदक होतं. यासह भारतानं पदकतालिकेत न्यूझीलंडला मागे टाकत चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे. भारतीय बॉक्सरने या वर्षाच्या सुरुवातीला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपचं विजेतापद पटकावलं होतं. आता राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहेत.