"नरेंद्र मोदी पंतप्रधान होऊ शकतात तर नितीश कुमार का नाही?"
नितीश कुमार यांच्या सरकारमध्ये बिहारचे उपमुख्यमंत्री झालेल्या तेजस्वी यादव यांनीही नरेंद्र मोदींना आव्हान दिलं आहे. नितीश कुमार यांच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीबाबत ते म्हणाले की, नरेंद्र मोदी पंतप्रधान होऊ शकतात, तर नितीशकुमार का होऊ शकत नाही. तेजस्वी यादव म्हणाले, बिहारमध्ये घडलेल्या या सत्तांतराने देशभरात एक संदेश गेला आहे. घाबरू नका पण लढा हा संदेश संपूर्ण देशात गेला आहे. यामुळे विरोधकांना बळ मिळालं आहे. त्यांना प्रशासकीय अनुभव आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान होऊ शकतात, तर नितीश कुमार का होऊ शकत नाहीत असा सवाल तेजस्वी यादव यांनी केला आहे.
नितीशकुमार नरेंद्र मोदींना कसं आव्हान देऊ शकतील? याबाबत तेजस्वी यादव म्हणाले की, विरोधी पक्षांना एकत्र बसून रोडमॅप तयार करावा लागेल. देशातील जनतेला नरेंद्र मोदींविरोधात चेहरा हवा आहे. भाजप राज्य सरकारं अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी ते ईडी आणि इतर केंद्रीय संस्थांचा वापर करतात. ईडीची इच्छा असल्यास ते इथे येऊन आपलं कार्यालय उघडू शकतात. ईडीचे लोक त्यांना हवं आहे तोपर्यंत इथे राहू शकतात. भाजपच्या सेलसारखं ते काम करतात असे गंभीर आरोप तेजस्वी यादव यांनी केले आहेत.
तेजस्वी यादव यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, जेडीयूसोबतच्या युतीबाबतही आम्ही चर्चा केली. या युतीबाबत आमचं कोणतंही नियोजन नव्हतं, हे सर्व अचानक घडलं. मात्र आम्ही राजकीय घडामोडींवर लक्ष ठेवून होतो. ही युती ही काळाची गरज आहे. नितीश कुमार भाजपमध्ये अस्वस्थ होते. आम्ही पाहत होतो की नितीशजी खूप अस्वस्थ आहेत. हे त्यांच्या चेहऱ्यावरून दिसत होतं. लालनसिंग यांच्यासारख्या लोकांनी भाजप त्यांचा पक्ष फोडण्याचा प्रयत्न करत असल्याचं सांगितलं असं तेजस्वी यादव म्हणाले.