तलाठी परीक्षेचा निकाल या तारखेला होणार जाहीर
बहुचर्चित तलाठी भरती परीक्षेचा निकाल डिसेंबरमध्ये जाहीर करून नव्या वर्षात प्रजासत्ताक दिनी नवनियुक्त तलाठयांना नियुक्तिपत्रे देण्याचा भूमी अभिलेख विभागाचा मानस आहे. त्यादृष्टीने नियोजन करण्यात येत आहे. राज्यभरातील ज्या उमेदवारांनी तलाठी भरती परीक्षा दिली, त्यांना उत्तरतालिका पाहून त्यावर हरकती घेण्यास दिलेली मुदत ८ ऑक्टोबरला संपली. प्राप्त हरकतींची तपासणी करून योग्य हरकतींना ३ नोव्हेंबरपर्यंत उत्तर दिले जाणार आहे.
तलाठी भरती परीक्षेसाठी साडेअकरा लाखांपेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज भरले होते. छाननी अंती ४४६६ जागांसाठी दहा लाख ४१. ७१३ असे विक्रमी अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी प्रत्यक्षात आठ लाख ६४.९६० उमेदवारांनी परीक्षा दिली. मोठ्या प्रमाणात अर्ज आल्याने ही परीक्षा तीन टप्यांत आणि दिवसातील तीन सत्रांत घेण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार १७ ते २२ ऑगस्ट पहिला टप्पा. २६ ऑगस्ट ते २ सप्टेंबर दुसरा टप्पा आणि ४ ते १४ सप्टेंबर असे तीन टप्पे करण्यत आले होते. एकूण परीक्षेची ५७ सत्रे झाली. परीक्षा झाल्यानंतर उमेदवारांना उत्तरपत्रिका पाहण्याची आणि त्यावर काही हरकती असल्यास त्या नोंदविण्याची सुविधा दिली होती. ही मुदत आता संपली आहे. प्राप्त हरकती परीक्षा घेणाऱ्या टीसीएस कंपनीकडून एकत्रित केल्या जात आहेत. प्रत्येक सत्राला वेगळी प्रश्नपत्रिका देण्यात आली होती.
त्यामुळे नेमक्या किती हरकती प्राप्त झाल्या. याबाबत टीसीएसकडून पुढील आठवड्यात माहिती प्राप्त होणार आहे. त्यापैकी योग्य हरकतींचे ३ नोव्हेंबरपर्यंत निराकरण केले जाणार आहे. तसेच हरकत योग्य असल्यास संबंधित सत्रातील उत्तरतालिका बदलण्यात येणार आहे. अशी माहिती अप्पर जमाबंदी आयुक्त आणि तलाठी भरती परीक्षेचे समन्वयक आनंद रायते यांनी दिली. ही सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर परीक्षा दिलेल्या उमेदवारांचा १५ डिसेंबरपर्यंत निकाल जाहीर करण्याचे नियोजन आहे.