बिलकिस बानूंचे आरोपी, कुलदीप सिंगरांच्याबद्दल गप्प का? अतिक यांच्या हत्येवरुन सुषमा अंधारेंचा निशाणा
मुंबई : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे तुरुंगात कैद झालेल्या गुंडातून राजकारणी झालेला अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ यांची पोलिसांच्या उपस्थितीत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. यामुळे एकच खळबळ माजला असून यावरून उत्तर प्रदेशसह संपूर्ण देशाचे राजकारण आता शिगेला पोहोचले आहे. विरोधकांकडून योगी व मोदी सरकारला लक्ष्य करण्यात येत आहे. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली असून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
काय म्हणाल्या सुषमा अंधारे?
चूक की बरोबर ठरवून शिक्षा देण्यासाठी कायदा, न्यायालय आहे. पण, हैदराबाद एन्काऊंटर नंतर पोलिसांचा सत्कार करणारे, अतिक-अश्रफ अहमद यांच्या एन्काऊंटर नंतर जैसे कर्म तैसे फळ अशी मुक्ताफळे उधळणारे भक्त, बिलकिस बानूंचे आरोपी, राजाभैय्या किंवा कुलदीप सिंगर यांच्या बद्दल गप्प का बरे असतात, असा निशाणा सुषमा अंधारे यांनी मोदी सरकारावर साधला आहे.
दरम्यान, अतिक आणि अशरफ अहमद यांची पोलीस व माध्यमांच्या कॅमेऱ्यांसमोर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्येनंतर हल्लेखोरांना उत्तर प्रदेश पोलिसांनी पकडले आहे. यादरम्यानचे व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. याआधी उत्तर प्रदेशातील झाशी येथे अतिक अहमदचा मुलगा असद चकमकीत मारला गेला होता. तर, उमेश पाल यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असताना अतिकने सर्वोच्च न्यायालयातही संरक्षण मागितले होते.