हार्दिक पंड्या नव्हे, रोहित शर्मानंतर 'हा' खेळाडू होणार टीम इंडियाचा कर्णधार, सुरेश रैनानं स्पष्टच सांगितलं
रोहित शर्मानंतर टीम इंडियाचा कर्णधार कोण असणार? याबाबत अनेक तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. अशातच भारताचा माजी क्रिकेटर सुरेश रैनानं यावर प्रतिक्रिया दिली आहे. लल्लनटॉपला मुलाखत देताना रैनानं भारताच्या भविष्यातील कर्णधाराबाबत मोठं विधान केलं आहे. रोहित शर्मानंतर भारताचा कर्णधार हार्दिक पंड्या नाही, तर शुबमन गिल असेल, असं रैनानं म्हटलं आहे. सुरेश रैना म्हणाला, कर्णधार म्हणून शुबमन गिलने मला खूप प्रभावित केलं आहे. गिलची कॅप्टन्सी जबरदस्त राहिली आहे. मोठ्या सामन्यांमध्ये दबावाला सामोरं कसं जायचं, याचं कौशल्य गिलकडे आहे. शुबमन गिल भारताचा पुढचा कर्णधार असेल, असं मला वाटतं.
रैनाने माध्यमांशी बोलताना पुढं म्हटलं, गिल मैदानात उतरल्यावर जबरदस्त कॅप्टन्सी करत आहे. मैदानाच्या बाहेर आशिष नेहरांचा सपोर्ट सिस्टम आहे, पण गिल मैदानात असल्यावर स्वत: कर्णधारपदाची धुरा सांभाळतो आणि आवश्यक ते निर्णय घेतो. मला त्याच्या रुपात भारताचा पुढील कर्णधार दिसतो.
हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्सचा कर्णधार झाल्यानंतर शुबमन गिलकडे गुजरात टायटन्सचं नैतृत्व देण्यात आलं. गिलने यंदाच्या आयपीएल हंगामात चांगली कॅप्टन्सी केली आहे. दुसरीकडे हार्दिकला मुंबईचं नेतृत्व करण्यात अद्यापही मोठं यश मिळालं नाही. तसंच चाहत्यांच्या ट्रोलिंगचा सामनाही हार्दिकला करावा लागत आहे.