...म्हणून मी फडणवीस, राज ठाकरेंचे आभार मानते - सुप्रिया सुळे
अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) ही नेहमीच सोशल मीडियावरील आपल्या वादग्रस्त पोस्टमुळे चर्चेत असते. अभिनेत्री यापुर्वीही अनेकदा वादग्रस्त विषयावर भाष्य करुन टीकेची धनी ठरली होती. आता पुन्हा एकदा 'पवारांना' उद्देशून एक काव्य स्वरुपातील मजकूर शेअर करत ती वादात सापडली आहे. अत्यंत खालच्या शब्दात टीका केल्यानं एक नवा वाद निर्माण झाला आहे. त्यावर आज शरद पवार यांच्या कन्या आणि राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) प्रतिक्रिया दिली. केतकी चितळे प्रकरणाबद्दल बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, ट्रोलिंग हा वेगळा विषय आहे. मात्र तिने जे काही केलं वाईट आहे. मी तर कुणाला ओळखतही नाही. तसंच मी देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे आभार मानते कारण त्यांनी या कृतीचा निषेध केला असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
यावेळी त्यांनी राज्यातील वेगवेगळ्या मुद्यांवरील आपलं म्हणणं मांडलं. अनिल देशमुखांना अटक करुन कित्येक दिवस उलटलेत. 109 वेळा त्यांनी देशमुखांच्या घरी रेड टाकली. मग 108 वेळा तुम्हाला काहीच मिळालं नाही का? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला.
नाना पटोले यांनी राष्ट्रवादीवर केलेल्या आरोपांवर त्या म्हणाल्या की, घरात भांड्याला भांड लागत असतं. संसारात या गोष्टी होत असतात. नेहमीच सगळं गुळगुळीत होऊ शकत नाही. अनेक दिवसांपासून लोक आमच्या या संसारावर संशय घेतात. मात्र हा संसार टीकेल असं सुप्रिया म्हणाल्या.
अकबरुद्दीन ओवैसींनी औरंगजेबाच्या कबरीवर माथा टेकवला. त्याबद्दल विचारलेल्या प्रश्नावर बोलताना त्या म्हणाल्या की, अशा गोष्टींकडे मी फारसं लक्ष देत नाही. कारण लोकांसमोर अनेक प्रश्न आहेत. त्यांच्या प्रश्नांबद्दल बोलायला आपल्याला आवडेल असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.