शरद पवारांच्या घोषणेनंतर सुप्रिया सुळे यांची पहिली प्रतिक्रिया म्हणाल्या...
शरद पवारांनी एक मोठी घोषणा केली आहे. सुप्रिया सुळे, प्रफुल पटेल राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे कार्यकारी अध्यक्ष असणार आहेत. शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात या मोठ्या घोषणा केल्या आहेत. दिल्लीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच राज्यातील निवडणुकांची जबाबदारी ही सुप्रिया सुळेंवर देण्यात आली आहे.
सुप्रिया सुळेंकडे महाराष्ट्र, पंजाब, हरियाणाची जबाबदारी देण्यात आली आहे तर प्रफुल पटेल यांच्यावर गुजरात, मध्यप्रदेश, राज्यस्थान, झारखंड, गोवा या राज्यांची जबाबदारी देण्यात आलेली आहे. अजित पवार यांच्यावर कोणतीही जबाबदारी देण्यात आली नाही आहे. या घोषणेनंतर आता अजित पवार आणि राजकीय वर्तुळातून काय प्रतिक्रिया येतात हे पाहणं महत्वाचं आहे.
याच पार्श्वभूमीवर आता सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया सुळे यांनी ट्विट करुन प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात माझी व प्रफुलभाई पटेल यांची कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली. याबद्दल पक्षसंघटनेची मी मनापासून आभारी आहे. पक्षाने माझ्यावर टाकलेला हा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी कटिबद्ध आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतक यांचे यापूर्वी उत्तम सहकार्य मिळाले आहे ते यापुढेही कायम राहिल हा विश्वास आहे. या जबाबदारी बद्दल आदरणीय पवार साहेब, पदाधिकारी, ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्ते आदी सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून आभार. असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.