'रिश्ते दिल से बनते है यार..' सुप्रिया सुळेंचा अजित पवारांवर निशाणा
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळ्याचं लक्ष बारातमी लोकसभा मतदारसंघाकडे लक्ष लागले आहे. कारण या मतदार संघातून खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी नणंद-भावजय लढत पाहायला मिळणार आहे. राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर अजित पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघ मिळविण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. ते पत्नी सुनेत्रा पवार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याच्या तयारीत आहेत. या सगळ्यांवर आता खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
“हा काही भातुकलीचा खेळ नाही. राजकारण भातुकलीचा खेळ नसतो. त्यात नाती नसतात पण जबाबदारी असते. नाती प्रेमाची असतात. मी नात्यांमध्ये आणि कामात गल्लत करत नाही. माझं काम एका जागेवर आहे. माजी नाती काही आडनावांपुरती मर्यादित नाही. मी सदानंद सुळेंसोबत जेवढा वेळ घालवते त्यापेक्षा जास्त कार्यकर्त्यांसोबत असते. नाती माझ्यासाठी कायमच राहतील. पण माझं एक प्रोफेशनल आयुष्य आहे, माझी एक वैचारिक बैठक आहे. ज्याच्यामध्ये मी लहानाची मोठी झाले. माझ्यासाठी ही लढाई वैयक्तिक नाही. माझी वैचारिक लढाई आहे. माझी लढाई भाजप आणि त्यांच्या चुकीच्या निर्णयांच्या विरोधात आहे. त्यांच्या चुकीच्या विचारात जे काम करत असतील त्या विचाराशी माझी लढाई आहे,” असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
कुछ रिश्ते दिल से बनते हैं,माझे अनेकांसोबत विश्वासाचे नाते आहे. त्यामुळे भावनिक आव्हानाला काही अर्थ नाही. आमचं सगळं कुटुंब राजकारणात नाहीय. आमच्या कुटुंबाला तुम्ही राजकारणात कशाला आणता? दादा बोलले असतील तर तुम्ही त्यांनाच विचार,असं म्हणत त्यांनी उत्तर देणे टाळले. तसेच समोर कोणताही उमेदवार असला तरी मी प्रामाणिकपणे लढेन, असं सुळे म्हणाल्या.
आदरणीय पंतप्रधान मोदी यांचे फोटो देशातील शाळा-कॉलेजमध्ये लावण्यात आले आहेत. सेल्फी पॉईंट तयार करण्यात आले आहेत. त्यांच्यासोबत फोटो काढण्याचा जीआर काढण्यात आला आहे. मोदीच सेल्फी काढण्यासाठी प्रोत्साहन करत असतात, असं म्हणत त्यांनी टीका केली.देशात लोकशाही आहे, दडपशाही नाही त्यामुळे चर्चा झालीच पाहिजे, असंही त्या म्हणाल्या.