कांद्याच्या मुद्द्यावरून सुप्रिया सुळेंचा केंद्र सरकारवर हल्लाबोल; म्हणाल्या...
नाफेडने कांदा निविदा काढण्याचा निर्णय घेतला आहे. दोन महिने आधीच याबाबतच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. त्यामुळे नाफेडकडे असलेल्या सव्वा दोन लाख टन कांद्याची देशांतर्गत बाजारपेठेत विक्री होऊ शकेल. नाफेडच्या या निर्णयाने गेल्या दोन दिवसात कांद्याचे दर वेगाने घसरू लागले आहेत.
याच पार्श्वभूमीवर आता सुप्रिया सुळे यांनी कांद्याच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत म्हटले आहे की, शेतकऱ्यांना चार पैसे मिळू लागले की, केंद्र सरकार एखादा विचित्र निर्णय घेते आणि कांद्याचा बाजार पडतो. यावर्षी नाफेडने दोन महिने अगोदरच कांदा विक्रीसाठी निविदा काढल्या आहेत. त्यामुळे नाफेडकडील सव्वादोन लाख टन कांदा खुल्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.
एवढ्या मोठ्या प्रमाणात कांदा बाजारात आणला जात असल्याने शेतकऱ्यांना आपल्याकडील कांदा कवडीमोल दराने विक्री करावा लागणार हे स्पष्ट आहे. शेतकऱ्यांचे हित जोपासण्याचा कसलाही आराखडा आणि मनसुबा या सरकारकडे नाही.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, सरकारच्या कृषिविरोधी विशेषतः कांदा उत्पादकांच्या संदर्भातील धोरणामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसानच सोसावे लागते ही वस्तुस्थिती आहे. शासनाने नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदीचा जो घाट घातला आहे त्याबाबत फेरविचार करण्याची गरज आहे.