सि्द्धू मुसेवालाच्या हत्येची CBI चौकशीची मागणी करणारी याचिका सुप्रिम कोर्टानं फेटाळली
पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येची सीबीआय चौकशी करण्याची मागणी फेटाळत सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाचं राजकारण करू नये, असा सल्ला दिला आहे. दोन याचिकांवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयानं हे निरीक्षण नोंदवलं. यापैकी एक याचिका गँगस्टर लॉरेन्स विश्नोईच्या वडिलांनी दाखल केलेली आहे. न्यायमूर्ती अजय रस्तोगी आणि अभय ओका यांच्या खंडपीठाने सांगितलं की, 'आमच्यासाठी सर्व पक्ष समान आहेत. अशा प्रकरणांमध्ये राजकीय पक्षांना स्थान नाही, असं आमचं मत आहे. कोण कोणत्या पक्षाचा आहे याने काहीही फरक पडत नाही. या न्यायालयाचे दरवाजे सर्वांसाठी खुले आहेत, त्यामुळे या प्रकरणाला राजकीय रंग देऊ नये.
मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पंजाबमधील मानसा जिल्ह्यातील जवाहरके गावात सिद्धू मूसवाला यांच्यावर हल्ला झाला होता. आरोपींनी सिद्धू मुसेवालाच्या गाडीला घेरलं आणि गोळीबार केला. गोळ्या लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणात पोलिसांनी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई यालाही आरोपी बनवलं असून तो सध्या कोठडीत आहे. सिद्धू मुसेवाला हे देखील काँग्रेसचे नेते होते. आप सरकारने घेतलेल्या निर्णयाअंतर्गत 400 लोकांसह सिद्धू मुसेवालाची देखील सुरक्षा काढून घेण्यात आली होती. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करणारा अर्जही भाजप नेते जगजित सिंग यांच्या वतीने दाखल करण्यात आला होता. याशिवाय बिश्नोईचे वडील लविंदर सिंग यांनीही अर्ज केला होता.