शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह नेमकं कुणाचे? सुप्रीम कोर्टात आज होणार सुनावणी

शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह नेमकं कुणाचे? सुप्रीम कोर्टात आज होणार सुनावणी

राज्यातील सत्तासंघर्षावर आज घटनापीठासमोर सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठापुढे आज, मंगळवारी सुनावणी होणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

राज्यातील सत्तासंघर्षावर आज घटनापीठासमोर सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठापुढे आज, मंगळवारी सुनावणी होणार आहे. खरी शिवसेना कोणाची, याबाबत निवडणूक आयोगापुढे सुनावणी प्रलंबित असून, ती सुरू करायची की नाही, याबाबतचा निर्णय आज होण्याची शक्यता आहे. विधिमंडळ गटनेतेपदावरून हकालपट्टी आणि प्रभू यांच्या मुख्य प्रतोदपदी नियुक्तीस शिंदे आणि त्यांच्या गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी आव्हान दिले आहे. या सर्व याचिकांवर न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती एम. आर. शहा, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती पी. एस. नरसिंह यांच्या पाच सदस्यीय घटनापीठापुढे मंगळवारी सुनावणी होणार आहे.

शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवून टाकण्याची शिंदे गटाची मागणी आहे. तर आधी आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय घेण्याची शिवसेनेनं मागणी केलीय. सुनावणी पूर्ण होईपर्यंत निवडणूक आयोगाने कोणताही निर्णय घेऊ नये, असा शिवसेनेनं सुप्रीम कोर्टात युक्तिवाद केला होता. दरम्यान, या सगळ्या युक्तिवादानंतर आज (27 सप्टेंबर) सुप्रीम कोर्टात पुन्हा युक्तिवाद केला जाईल. त्यानंतर आम्ही निर्णय घेऊ, असं सुप्रीम कोर्टानं मागील सुनावणीत म्हटलं होतं.

शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या अपात्रतेवर सुनावणी होणार असून आज एक महत्त्वपूर्ण निर्णयही समोर येण्याची शक्यता आहे. खरी शिवसेना आम्हीच आहोत, असा दावा करणाऱ्या एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांच्या विरोधात उद्धव ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. आता याप्रकरणी आज निर्णय होणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com