"सुजय विखे पाटील यांना लोकसभेत पाठवल्याशिवाय पर्याय नाही"; उपमुख्यमंत्री अजित पवार असं का म्हणाले?
Ajit Pawar On Sujay Vikhe Patil : अहिल्यानगर लोकसभेच्या निवडणुकीसाठी १३ तारखेला मतदान होणार आहे. पहिला, दुसरा, तिसरा टप्पा झालेला आहे. आता चौथ्या टप्प्याची निवडणूक आहे. पाचव्या टप्प्यात २० तारखेला राज्यातील निवडणुका संपतील. पण सहाव्या आणि सातव्या टप्प्यात देशातील इतर राज्यातील निवडणुका होणार आहेत. सुजय विखे पाटील दुसऱ्यांदा लोकसभेत जायला निघाले आहेत. त्यांना तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. त्यांना तुमच्या भक्कम पाठिंब्याची गरज आहे. महायुतीच्या माध्यमातून ते निवडणूक लढवत आहेत. कर्जत-जामखेडच्या विकासासाठी सुजय विखे पाटील यांना लोकसभेत पाठवल्याशिवाय पर्याय नाही, असं मोठं विधान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. ते कर्जतमध्ये महायुतीच्या प्रचारसभेत बोलत होते.
जनतेला संबोधीत करताना अजित पवार म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ८० टक्के आमदारांनी आणि पदाधिकाऱ्यांनी महायुतीत जाण्याचा निर्णय घेतला. आम्ही कधीही वडीलधाऱ्यांचा अनादर केला नाही. वडीलधाऱ्यांना दैवत मानून आम्ही कामं केली. पण, वडीलधाऱ्यांनी ८० वर्षांच्या पुढे गेल्यानंतर इतरांना संधी दिली पाहिजे. भारतीय जनता पक्षात ७५ वर्ष झाल्यानंतर नेते निवृत्ती घेतात. परंतु, आमच्यात कोणी निवृत्ती घ्यायचं नावच घेत नाही. आम्ही साठीच्या पुढं गेलो, आम्ही किती दिवस थांबायचं? आम्ही कामात कमी नाही. आम्ही विकास करतो. आमची प्रशासनावर पक्कड आहे. बारामतीत कशाप्रकारे कायापालट केला, तुम्हा सर्वांना माहित आहे. पिंपरी-चिंचवड २५ वर्ष माझ्या ताब्यात होतं. देशातील उत्तम शहर म्हणून पिंपरी-चिंचवडचा नावलौकीक झाला.
माझ्या जिल्ह्यात आम्ही संस्था उत्तम प्रकारे चालवल्या. त्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येऊ दिली नाही. दुधाच्या चांगल्या संस्था चालवतो. शिक्षण संस्था चांगल्या प्रकारे चालवतो. काम करताना जाती-पातीचा विचार करत नाही. जातीय सलोखा राहण्यासाठी बाराबलुतेदारांना सोबत घेऊन जातो. सर्वांना सोबत घेऊन गेलो पाहिजे. ठराविक लोकांची मक्तेदारी नाहीय. ठराविक लोकांनीच राजकारण करावं, असं कुठं लिहिलेलं नाहीय. चांद्यापासून बांद्यापर्यंत सर्वांचाच विचार करावा लागतो. केंद्राचा निधी आल्याशिवाय महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लागणार नाहीत. त्यासाठी केंद्राच्या विचाराचा खासदार निवडून आणायचा आहे. नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी सुजयला निवडून आणायचं आहे.
रेसकोर्सच्या सभेत पंतप्रधान मोदी आले होते. त्यावेळी मी त्यांना सांगितलं, आमच्या नगर, सोलापूर, पुणे जिल्ह्यात पाण्याची फार कमतरता आहे. शेतकऱ्याला त्याच्या शिवारात पाणी दिलं, तर सोनं पिकवण्याची त्याची ताकद आहे. अर्थमंत्री म्हणून मी गेले सात-आठ वर्ष काम करत आहे. परंतु, राज्य सरकारच्या निधीतून ही कामं होणार नाही. त्यासाठी तुमचा निधी आम्हाला लागेल.
तुमचा पाठिंबा आम्हाला लागेल. पूर्वीच्या काळात पाण्यापासून वीज निर्माण करणं सोपं वाटायचं. पण आता पाण्यापासून वीज करण्यापेक्षा ते पाणी जनतेला प्यायला आणि शेतकऱ्यांना शेतीसाठी दिलं पाहिजे. कांदा निर्यात बंदीमुळं शेतकरी अडचणीत आला होता. परंतु, मोदींनी शेतकऱ्यांचा विचार करून कांदा निर्यात बंदी उठवली. आता कांद्याचे भावही वाढले आहेत. वेगवेगळ्या पिकांना मदत करण्याची भूमिका मोदी घेत आहेत, असंही अजित पवार म्हणाले.