Sudhir Mungantiwar
Sudhir Mungantiwar

सुधीर मुनगंटीवारांचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल, म्हणाले; "आजही आम्ही १२८ विधानसभेत..."

"कार्यकर्त्यांनी परिश्रम केल्यानंतर आणि महायुतीनं ताकद दाखवल्यावर पुन्हा महायुतीचंच सरकार येईल, हा विश्वास आहे"
Published by :
Naresh Shende
Published on

Sudhir Mungantiwar Press Conference : देशाला तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था करण्याचा देशाच्या विकासाचा हा संकल्प होता. संविधान बदलणार, आरक्षण रद्द केलं जाईल, अशा पद्धतीचे नॅरेटिव्ह उठले होते. अशा नॅरेटिव्हच्या माध्यमातून लोकांना भ्रमिष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. हे मायावीरुप घेऊन तुम्ही प्रयत्न केला आहे, याला विधानसभेत उत्तर मिळेल. ससा आणि कासवाच्या शर्यतीत एकदाच कासव जिंकला. ससा नेहमीच जिंकला. आजही १२८ विधानसभेत आम्ही पुढे आहोत. तुमच्या १६० विधानसभेपैकी अतिशय बॉर्डरवर असणाऱ्या ३७ विधानसभा आहेत. कार्यकर्त्यांनी परिश्रम केल्यानंतर आणि महायुतीनं ताकद दाखवल्यावर पुन्हा महायुतीचंच सरकार येईल, हा विश्वास आहे, असं मोठं विधान सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकार परिषदेत केलं आहे.

मुनगंटीवार पुढे म्हणाले, मुस्लीम समाजाने त्यांना भरभरून मतदान दिलं, ही गोष्ट खरी आहे. मराठी माणसांनी कमी दिलं. एकट्या मालेगाव विधानसभेत १ लाख ९८ हजार महाविकास आघाडीला आणि साडेचार हजार मतं आम्हाला मिळाली. यातून असं लक्षात येतं की, काही विशिष्ट समुदायाच्या लोकांनी आम्हाला मतदान केलं नाही. विधानसभा निवडणूक महाविकास आघाडी एकत्रिपणे लढणार, असा निर्धान मविआच्या नेत्यांनी केला आहे, यावर प्रतिक्रिया देताना मुनगंटीवार म्हणाले, आज पत्रकार परिषदेत काँग्रेसचे मोठे नेते उपस्थित नव्हते.

त्यांना निमंत्रणच दिलं नाही. इथूनच सुरुवात असेल, तर विधानसभेची निवडणूक येईपर्यंत आणखी काय काय पुढे येईल, हे पाहावं लागेल. महायुतीचा भाग असलेल्या शिंदे गटाचे काही आमदार म्हणतात की, लोकसभेत आमचा स्ट्राईक रेट चांगला राहिला आहे. आम्ही आता मोठे भाऊ आहोत. यावर मुनगंटीवार म्हणाले, हे वाक्य शिंदे साहेबांनी कधी वापरलं नाही. एखादा कार्यकर्ता उत्साहात असं म्हणत असेल, तर ती शिंदे गटाची भूमिका असूच शकत नाही.

छगन भुजबळ राज्यसभेच्या उमेदवारीवरून नाराज असल्याचं बोललं जात आहे, वरिष्ठ असूनही मान मिळत नाही, असं त्यांचं म्हणणं आहे, यावर प्रतिक्रिया देताना मुनगंटीवार म्हणाले, भुजबळ साहेब नाराज आहेत, असं मला वाटत नाही. मंत्रिमंडळाच्या बैठकीत पहिल्या क्रमांकावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यानंतर मंत्री म्हणून पहिल्या क्रमांकाच्या खूर्चीवर बसतात. ते अनुभवी आहेत. ते संघर्षयोद्धा आहेत, म्हणून मला असं वाटतं ते नाराज नाहीत. मंत्रिपदाचा राजीनामा दिला, तर निश्चितच ते नाराज आहेत, असं आपण समजू शकतो, असंही सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com