Sudhir Mungantiwar
Sudhir Mungantiwar

महाराष्ट्रातल्या मंत्र्यांमध्ये फक्त तुम्हाला उमेदवारी दिलीय, यामागचं गणित काय? सुधीर मुनगंटीवार थेट म्हणाले," संसदेच्या दरवाजांना..."

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अनेक राजकीय मुद्द्यांवर भाष्य केलं. लोकशाहीला मुलाखत देताना त्यांनी विरोधकांचा समाचारही घेतला.
Published by :
Naresh Shende
Published on

"चंद्रपूर लोकसभेत मागच्या निवडणुकीत आमचा पराभव झाला. त्यामुळे या निवडणुकीत लोकसभेचा उमेदवार निवडून यावा, असं भाजपला वाटलं. म्हणून पहिल्यांदा ती जबाबदारी माझ्यावर टाकण्यात आली. मी याआधी १९८९ मध्ये लोकसभेची निवडणूक लढवली आहे. तेव्हा मला दोन लाख मत मिळाली. पण मी ४० हजार मतांनी पराभूत झालो. कॉलेजमध्ये शिकत असताना १९९१ ची लोकसभा निवडणूक लढवली. तेव्हा राजीव गांधी यांची हत्या झाली आणि पराभव झाला. १६ मार्च १९९५ पासून २९ वर्ष विधानसभा सदस्य म्हणून मतदार संघातील जनतेचे प्रश्न मांडले. त्यामुळे पक्षाने माझ्यावर विश्वास व्यक्त केला. 'अब की बार चारसो पार'मध्ये या मतदारसंघाचाही समावेश व्हावा म्हणून मला संधी दिली. मी दिलेलं लाकूड संसदेच्या दरवाजांना लावलं, कदाचित त्या दरवाजांनाही वाटलं असेल मी त्या दरावाजातून जावं", अशी प्रतिक्रिया राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी लोकशाहीशी बोलताना दिली. चंद्रपूर मतदारसंघात लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारी मिळालेल्या मुनगंटीवार यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं.

पहिली लोकसभेची निवडणूक पहिल्या नंबरने पास होणार का? या प्रश्नाचं उत्तर देताना मुनगंटीवार म्हणाले, माझ्या मतदारसंघातून एफडीसीएमचं लाकूड पाठवलं आणि नवीन संसद भवनाचा प्रत्येक दरवाजा बनवण्यात आला. मला कधी वाटलं नाही की, त्या दरवाजातून मला प्रवेश करावं लागेल. मी जे राज्यगीत निवडलं, त्याचे शब्द आहेत, दिल्लीचेही तख्त राहतो महाराष्ट्र माझा. मला कधी वाटलं नव्हतं की, दिल्लीत जावं लागेल. पक्षाने आदेश दिला आणि पूर्ण शक्तीने त्या आदेशाचं पालन केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विकासकामांवर, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या आपल्या महाराष्ट्राच्या प्रगतिच्या मार्गावर मी आहे. जनता विकासाच्या बाजूने उभी राहील, असा मला विश्वास आहे.

महाराष्ट्रातली निवडणूक जितकी वाटतेय तितकी सोपी नाही? या प्रश्नाचं उत्तर देताना मुनगंटीवार म्हणाले, जे लोक काम करतात,विकासकार्य करतात आणि राजकारणाऐवजी समाजकार्य करतात, त्यांच्या पाठिशी जनता उभी राहते. काही लोकांचा गैरसमज आहे की, लोकसभेची निवडणूक देशाच्या विकासकामांवर होत नाही. चुकीच्या भाषेचा वापर करून निवडणूक जिंकू शकतो, असा काहिंचा गैरसमज आहे. भीती दाखवण्याचा काही लोकांचा स्वभाव झालाय. पराभूत झाल्यावर ईव्हीएम मशिनला जबाबदार धरायचं. कर्नाटक जिंकल्यावर आकाश सुद्धा त्यांना ठेंगणं वाटायचं. कर्नाटक जिंकल्यावर मोदी सरकार हटलं, असा भाव आणायचा. हा अंहकारपणा जनतेच्या लक्षात येतो. महाराष्ट्रातील जनेतलाही हे समजलं आहे. आमच्या महायुतीच्या मागे जनता उभी राहील. विकासकामांच्या आधारावर जनता आमच्यासोबत राहणार आहे.

महाराष्ट्रातल्या पळवापळवीपासून आरक्षणाच्या मुद्द्यांना सरकारला तोंड द्यावं लागलं आहे. काही वेळेला भाजप सरकारची कोंडी होतेय, याचा काय परिणाम तुमच्या लोकसभा निवडणुकीवर होणार आहे, यावर उत्तर देताना मुनगंटीवार म्हणाले, मराठा समजासाठी महाविकास आघाडीचे सर्व नेते विरोधात राहिले, मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नाही, देणार नाही, असं शरद पवार यांचं वक्तव्य असायचं. विशेष अधिवेशन बोलावून १० टक्के आरक्षणही दिलं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मराठा तरुण तरुणींना न्याय देण्याचा प्रयत्न केला. हा समाज १० टक्के आरक्षण देणाऱ्या महायुतीच्या मागे उभा राहिल. मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या शरद पवारांच्या पाठिशी मराठा समाज नाही. काही राजकीय नेते आमच्या पक्षात आल्यावर ते शिवबंधन बांधतात, तेव्हा दुसऱ्या पक्षाचा नेता त्यांना चालतो. काँग्रेसच्या चतुर्वेदी ताई पक्षात येतात, तेव्हा त्या पक्षाचा विस्तार आणि भारतीय जनता पक्षात आले की पोटदुखी. शरद पवार यांनी गोपिनाथ मुंडेंचं घर तोडून धनंजय मुंडेना घेतलं, तर शरद पवारांचा एक वैचारिक प्रभाव, त्यांचा करिष्मा. पण भारतीय जनता पक्षात अशोक चव्हाण आल्यानंतर कुईकुई का सुरु होते.

यंत्रणांचा वापर करुन आम्ही कुणालाच पक्षात आणलं नाही, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या, यावर प्रतिक्रिया देताना मुनगंटीवार म्हणाले, मी जर नावे घ्यायला सुरुवात केली, तर यांचे सर्व विषय बाहेर पडतील. सुरेश कलमाडी शरद पवारांचे हितचिंतक होते का? देवेंद्र फडणवीसांना नोटिस देणारे कोण नेते होते, नारायण राणे केंद्रीय मंत्री असताना त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आणि जेवत असताना त्यांना अटक केली. यामागे कोण नेते होते? खासदार नवनीत राणा यांना १४ दिवस तुरुंगात टाकणारे कोण नेते होते, याचा शोध घ्या.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com