Navi Mumbai Metro: सिडकोतर्फे मेट्रोच्या भाड्यामध्ये 33 टक्क्यांपर्यंत लक्षणीय कपात

Navi Mumbai Metro: सिडकोतर्फे मेट्रोच्या भाड्यामध्ये 33 टक्क्यांपर्यंत लक्षणीय कपात

सिडकोतर्फे नवी मुंबई मेट्रो प्रकल्पांतर्गत मार्ग क्र. 1 बेलापूर ते पेंधर विकसित करण्यात आला आहे.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

विकास मिरगाने | मुंबई: सिडको महामंडळातर्फे, बेलापूर ते पेंधर या नवी मुंबई मेट्रो मार्गावरील मेट्रोच्या तिकीटांमध्ये 33% पर्यंत लक्षणीय कपात करण्यात आली असून दि. 07 सप्टेंबर 2024 पासून नवी मुंबई मेट्रो सेवेकरिता सुधारित तिकीट दर लागू होणार आहेत. सुधारित दरांनुसार तिकीटाचा किमान दर रु. 10 व कमाल रु. 30 असणार आहे.

“जलद आणि आरामदायी प्रवासाचा पर्याय असणाऱ्या मेट्रोचा लाभ अधिकाधिक प्रवाशांना घेता यावा याकरिता तिकीट दरांमध्ये कपात करण्यात आली आहे. सुधारित तिकीट दरांमुळे जवळच्या तसेच लांबच्या अंतरावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही फायदा होणार आहे. यापुढेही नवी मुंबईकरांनी मेट्रो सेवेला असाच उत्तम प्रतिसाद देत राहावा आणि या सेवेचा लाभ घ्यावा.” असे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको श्री. विजय सिंघल म्हणाले.

या मार्गावर प्रवास करणाऱ्यांना प्रवाशांना दिलासा देण्याकरिता मेट्रोच्या तिकीट दरात कपात करण्यात आली आहे. सुधारित दरांनुसार पहिल्या 0 ते 2 कि.मी. आणि 2 ते 4 कि.मी. करिता रु. 10, पुढील 4 ते 6 कि.मी. आणि 6 ते 8 कि.मी. करिता रु. 20 आणि 8 ते 10 कि.मी. च्या टप्प्यासह त्या पुढील अंतराकरिता रु. 30, असे तिकीट दर लागू होणार आहेत. यापूर्वी, बेलापूर टर्मिनल ते पेंधर टप्प्याकरिता तिकीटाचा दर रु. 40 इतका होता. हा तिकीट दर आता रु. 30 असणार आहे.

सिडकोतर्फे नवी मुंबई मेट्रो प्रकल्पांतर्गत मार्ग क्र. 1 बेलापूर ते पेंधर विकसित करण्यात आला आहे. या मार्गामुळे सीबीडी, तळोजा एमआयडीसी आणि सिडकोच्या खारघर येथील गृहसंकुलांना उत्तम कनेक्टिव्हिटी लाभली आहे. या मार्गावर 17 नोव्हेंबर 2023 पासून मेट्रो सेवा सुरू झाली असून प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मेट्रो सेवेला लाभला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com