एसटीची 'सीएनजी ' कोकण गाठणार! ५०० कि.मी. अंतरापर्यंत धावणार
एसटी महामंडळाला आधुनिक बनविण्यासाठी इतर पर्यायी इंधनाचा वापर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. एसटीच्या बसेस डिझेलवरच धावतात. तसेच डिझेल इंधनामुळे हवेत सर्वाधिक प्रदूषण तर होतेच, शिवाय ते परवडत नसल्याने एसटी महामंडळ आर्थिक संकटात सापडले आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक बसेसचा पर्याय पुढे आला आहे. सध्या नगर-पुणे मार्गावर पहिली इलेक्ट्रिक शिवाई बस धावत आहे. लवकरच ताफ्यात उर्वरित इलेक्ट्रिक बसेस दाखल होतील. या बसेसना मुंबई ते पुणे या फायद्याच्या मार्गावर चालविण्याची योजना आहे.
इलेक्ट्रिकसोबत सीएनजी आणि एलएनजी बसेसची देखील खरेदी करण्यात येणार आहे. एरव्ही सीएनजी बसेस या शहरात कमी लांबीच्या मार्गावर चालविण्यात येतात. परंतु एसटीसाठी खास मोठी इंधन क्षमता असलेली सीएनजी बस डिझाईन करण्यात आली आहे. या बसेस किमान ५०० कि.मी. धावतील असे त्याचे डिझाईन तयार करण्यात आले आहे.