छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा वाद पेटला; पोलीस आणि आंदोलकांमध्ये जोरदार झटापट
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा वाद चांगलाच पेटला आहे. सांगलीतील आष्टा येथील हा प्रकार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रात्री पोलीस बंदोबस्तात हटवण्यात आला आहे. यावेळी परिसरामध्ये 144 कलम लागू करण्यात आलं होतं. शिवप्रेमींनी गनिमी काव्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याची प्रतिष्ठापना केली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ महाआरती करण्याचं जाहीर करण्यात आलं होतं.
हा पुतळा रात्री हटवण्याची शक्यता वर्तवली जात असल्यामुळे शिवप्रेमींनी आष्टा मधील सांगली- इस्लामपूर रस्त्यावर ठिय्या मारला. रात्री उशिरा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यात आला. या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण आहे.आंदोलकांनी रास्ता रोको सुरू केला. पोलिसांनी आंदोलकांना हटवण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये जोरदार झटापट झाली. पोलिसांनी रस्ता रोको करत असलेल्या आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे.