उद्योगांना चालना देण्यासाठी चंद्रपूर येथे फेब्रुवारीत राज्य उद्योग मित्र परिषद घेणार
अनिल ठाकरे|चंद्रपूर: चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील नवउद्योजकांना मार्गदर्शन करण्यासाठी येत्या फेब्रुवारी महिन्यात चंद्रपूर येथे "राज्य उद्योग मित्र परिषद" घेण्यात येणार असून औद्योगिक विकासाला चालना मिळावी यासाठी एम. आय. डी. सी. मध्ये असलेल्या उद्योगांना बळ देऊन नवीन मोठे उद्योग या दोन जिल्ह्यात यावेत यासाठी आज उद्योग मंत्री श्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली आज नागपूर येथे हरिसिह वन सभागृहात बैठक झाली. वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तसेच चंद्रपूरचे पालकमंत्री ना श्री सुधीर मुनगंटीवार यांनी या बैठकीसाठी पुढाकार घेतला होता. या बैठकीत अधिकाऱ्यांशी चर्चा करताना उद्योगाला चालना देण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण निर्णय झाले.
चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याच्या औद्योगिक विकासावर चर्चा करताना ना. श्री सुधीर मुनगंटीवार यांनी एमआयडीसी मध्ये आवंटीत करण्यात आलेल्या ज्या भूखंडांवर ५ वर्षांनंतरही उद्योग उभारले नाहीत, अश्या भूखंडांची चौकशी करावी व माहीती घ्यावी अशी सूचना मांडली; त्याला उद्योग मंत्री ना उदय सामंत यांनी तात्काळ होकार दिला व संबंधितांना कार्यवाही चे निर्देश दिले.
नव उद्योगांना चालना मिळावी तसेच एमआयडीसी मध्ये नवीन उद्योग यावेत यावर भर देण्याची मागणी ना. सुधीर मुनगंटीवार यांनी केली ; त्यावर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य उद्योगमित्र परिषद येत्या फेब्रुवारी महिन्यात चंद्रपूर येथे घेण्याचे निर्देश उद्योग मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले. उद्योगांना कौशल्यपूर्ण मनुष्यबळ उपलब्ध व्हावे यासाठी एमआयडीसी मध्ये केंद्र शासनाच्या वतीने कौशल्य विकास केंद्र उभारणार असल्याचे ना सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.
एमआयडीसी मधील कामगारांना त्याच भागात घरकुलासाठी भूखंड उपलब्ध करुन देण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा झाली. जिल्ह्यातील पोंभूर्णा औद्योगिक क्षेत्राच्या विकासाकरिता आदिवासी क्षेत्र असल्याने "प्लग अँड प्ले" तत्वावर काम करण्यात येणार असून यामुळे या तालुक्यासह परिसराच्या विकासाला गती येणार आहे. घुग्गुस आणि भद्रावती येथील औद्योगिक विकासाच्या संदर्भात उद्योग मंत्र्यांशी ना. मुनगंटीवार यांनी चर्चा केली.
आदिवासी क्षेत्र असल्याने एमआयडीसी करीता विशेष निधी !
गडचिरोली आणि चंद्रपूर हे आदिवासी बहुल क्षेत्र असून या भागातील औदयोगिक विकासाला चालना मिळावी म्हणून एमआयडीसीतील पायाभूत मूलभूत सुविधांसाठी विशेष निधी मंजूर करावा अशी मागणी व सूचना ना. सुधीर मुनगंटीवार यांनी करताच उद्योग मंत्री ना उदय सामंत यांनी मान्यता दिली.