"मी खुप नैराश्यात आहे..."; यवतमाळमध्ये ST कर्मचाऱ्याची आगारात आत्महत्या
यवतमाळ | संजय राठोड : एस. टी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न समाजासमोर आणि सरकारसमोर आले होते. एसटी कर्मचाऱ्यांनी (ST Workers) हे आंदोलन करत राज्य शासनात एसटी महामंडळाचं विलिनीकरण करावं ही मागणी केली होती. पुढे या आंदोलनात वेगवेगळी वळणं आली आणि अखेर काही दिवसांपूर्वी हे आंदोलन संपलं. मात्र अजुनही एसटी कर्मचाऱ्यांसमोरच्या समस्या संपलेल्या दिसत नाहीत. यवतमाळमध्ये (Yavatmal) एका एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्या केली आहे. 'मी खुप नैराश्यात आहे अशी चिठ्ठी लिहून पूसद आगाराच्या वाहकाने कर्मचाऱ्यांच्या विश्रांती गृहातील शौचालयाच्या खिडकीला गळफास घेऊन आत्महत्या केली.
पुसद आगारात घडलेल्या घटनेने खळबळ उडाली आहे. अशोक पुंडलिक डोईफोडे या 55 वर्षीय कर्मचाऱ्याने घेतलेल्या या निर्णयामुळे पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांच्या प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशोक डोईफोडे हे तब्येतीच्या कारणाने रजेवर होते. रजा असतांनाही कार्यालयीन कपडे घालून ते पुसद आगारात आले. त्यानंतर विश्रांतीगृहाच्या शौचालयात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी मी खुप नैराश्यात आहे. अशी एका ओळीची चिठ्ठी लिहून खिशात ठेवली होती. या प्रकरणी पोलिसांनी पंचनामा केला आहे.