एसटी महामंडळाच्या शिष्टमंडळाची आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठक; आजच्या बैठकीत तोडगा निघणार?
ऐन सणासुदीच्या काळात एसटी लालपरीची चाके थांबली आहेत. एसटी बसेस सकाळपासून डेपोमध्येच उभ्या असल्याने बसस्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी होत आहे. सरकारने तातडीने हा संप मिटवावा, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. अशातच आता राज्य सरकारने हा संप मिटविण्यासाठी पुढाकार घेतल्याची माहिती समोर आले आहे.
एसटी महामंडळाच्या शिष्टमंडळाची आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत बैठक होणार आहे. वर्षा निवासस्थानी संध्याकाळी 7:00 वाजता ही बैठक होणार आहे. या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर चर्चा होणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावे अशी मागणी कर्मचाऱ्यांची आहे.
एसटी कर्मचार्यांच्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. मंगळवारी दुपारी उद्याोगमंत्री उदय सामंत यांनी समितीच्या शिष्टमंडळाबरोबर चर्चा केली होती. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. चर्चेतून मार्ग न निघाल्यास आंदोलन तीव्र होणार असल्याचे एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनेने म्हटले आहे. सरकार मागण्यांबाबत सकारात्मक असून सणासुदीच्या काळात आंदोलन करून प्रवाशांची गैरसोय करू नये, असे आवाहन सामंत यांनी केले. मात्र मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन मागे घेण्यास संघटनेने नकार दिल्यामुळे बैठकीत तोडगा निघू शकला नाही. एसटी महामंडळानेही प्रवाशांची गैरसोय होईल, अशी कोणतीही कृती करू नये, असे आवाहन कर्मचाऱ्यांना केले.