Sri Lanka Economic Crisis : आंदोलकांवर पोलिसांचा गोळीबर, एक ठार
Sri Lanka Economic Crisis : श्रीलंकेतील आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर सरकारविरोधात निदर्शनांनी आता तीव्र स्वरुप धारण केलं आहे. मंगळवारी पहिल्यांदाच पोलिसांनी (Sri Lanka Police) हिंसक जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी गोळीबार (Police Firing) केला. यामध्ये एका आंदोलकाचा मृत्यू झाला. तर तब्बल 10 जण जखमी आहेत.
आंदोलकांना नियंत्रित करण्यासाठी गोळीबार केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मध्य श्रीलंकेतील रामबुक्कानामध्ये आंदोलकांनी महामार्ग रोखला होता. हे ठिकाण कोलंबोपासून ९५ किमी अंतरावर आहे. तेल संकट आणि पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे लोकांमध्ये सरकारविरोधात रोष निर्माण झाला आहे.
दरम्यान, श्रीलंकेत महिनाभरापेक्षा जास्त काळापासून सरकारविरोधात आंदोलन सुरु आहे. श्रीलंका सध्या दिवाळखोर झाला असून, यासाठी सत्तेत असेलेलं राजपक्षे कुटुंब जबाबदार असल्याचा आरोप सर्वसामान्यांकडून केला जातोय. त्यामुळे आता आणखी किती दिवस श्रीलंकेत अराजकता राहणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.