Sri Lanka Crisis : भारत ठरला श्रीलंकेला अडचणीच्या काळात सर्वात जास्त कर्ज देणारा देश
2022 च्या पहिल्या चार महिन्यांत भारत श्रीलंकेला सर्वात जास्त कर्ज देणारा देश म्हणून ठरला आहे. भारतानं या चार महिन्यांत श्रीलंकेला $37.69 कोटी कर्ज दिलं. त्याचवेळी चीनने श्रीलंकेला फक्त $6,790 कोटी कर्ज दिलं आहे. श्रीलंका आतापर्यंतच्या सर्वात वाईट आर्थिक संकटाशी झुंज देत आहे. 22 दशलक्ष लोकसंख्या असलेल्या श्रीलंकेची स्थिती परकीय चलनाअभावी वाईट झाली आहे. अन्न, औषध आणि पेट्रोल-डिझेलच्या तीव्र टंचाईमुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. राजपक्षे परिवाराच्या विरोधात लोकांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे देशात राजकीय संकट देखील निर्माण झालं आहे.
गेल्या महिन्यात, श्रीलंकेने परकीय कर्जाची परतफेड करण्यात अपयशी ठरला आणि त्याची चलनवाढ जवळपास 50% नी वाढली. बिघडलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे लोकांकडून मोठ्या प्रमाणात निदर्शनं झाली. यामुळे राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांनी देशातून पळ काढला आणि आपल्या पदाचा राजीनामा दिला. डेली मिरर या वृत्तपत्राच्या अहवालानुसार, 2022 च्या पहिल्या चार महिन्यांत म्हणजेच 30 एप्रिलपर्यंत वितरित केलेल्या पैशांच्या बाबतीत भारत कर्जदारांच्या यादीत अग्रस्थानी आहे. आशियाई विकास बँक (ADB) या कालावधीत श्रीलंकेला $35.96 कोटी कर्ज देणारी दुसऱ्या क्रमांकाची बँक आहे. त्यानंतर जागतिक बँकेने सुद्धा श्रीलंकेला $6.7 कोटी कर्ज दिलं आहे. या वर्षाच्या सुरुवातीला जेव्हा श्रीलंकेला परकीय चलनाची तीव्र टंचाई जाणवायला सुरुवात झाली होती, तेव्हा भारताने बचावासाठी धाव घेतली.
दरम्यान, 2022 च्या पहिल्या चार महिन्यांत, श्रीलंकेला $0.7 दशलक्ष अनुदानासह $96.81 दशलक्ष विदेशी कर्ज मिळालं आहे. 2022 च्या सुरुवातीपासून श्रीलंकेला भारताच्या परकीय मदतीचं संपूर्ण पॅकेजच गेलं आहे. यामध्ये इंधन, अन्न आणि औषधांच्या आपत्कालीन खरेदीसाठी भारताने श्रीलंकेला कर्ज दिलं.