RCB च्या गोलंदाजांना 'हेड'ची झाली डोकेदुखी! हैदराबादने पुन्हा रचला धावांचा डोंगर; IPL मध्ये केल्या सर्वाधिक धावा
आयपीएल इतिहासात सर्वाधिक धावांचा डोंगर उभा करण्यात सनरायजर्स हैदराबादचा संघ पुन्हा यशस्वी झाला आहे. बंगलोरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर धावांचा पाऊस पाडणाऱ्या हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरविरोधात २० षटकांत ३ विकेट्स गमावून २८७ धावा केल्या. आयपीएलमधील हा सर्वाधिक स्कोअर असून हैदराबादने त्यांच्याच २७७ धावांचा जुना विक्रम मोडीत काढला आणि नव्या विक्रमाला गवसणी घातली. आरसीबीला विजयासाठी २८८ धावांचं तगडं आव्हान हैदराबादने दिलं आहे.
हैदराबादचा सलामीचा फलंदाज ट्रेविस हेडने वादळी खेळी करून ४१ चेंडूत १०२ धावा कुटल्या. हेडच्या शतकी खेळीच्या जोरावर, तसंच हेनरिक क्लासेन ६७, अभिषेक शर्मा ३४, एडन मार्करम नाबाद ३२ आणि अब्दुल समदनेही नाबाद ३७ धावांची खेळी केल्यानं हैदराबादला २८७ धावांपर्यंत मजल मारता आली.
आरसीबीचा गोलंदाज लॉकी फर्ग्युसनने ४ षटकांत ५२ धावा देत २ विकेट्स घेतल्या. तर रिस टोपलेला एका विकेटवर समाधान मानावं लागलं. हैदराबादने यंदाच्या आयपीएल हंगामात मुंबई इंडियन्सविरोधात झालेल्या सामन्यात २७७ धावा केल्या होत्या. पण आता हैदराबादने २८७ धावा करुन पुन्हा आयपीएलच्या इतिसाहात नव्या विक्रमाची नोंद केलीय.