IPL मध्ये भारतीय फलंदाजाची मोठ्या विक्रमाला गवसणी, क्लासेन आणि ट्रेविस हेडला टाकलं मागे
आयपीएल २०२४ मध्ये विदेशी फलंदाजांशिवाय भारतीय फलंदाजही धावांचा पाऊस पाडत आहेत. सनरायजर्स हैदराबादचा स्टार फलंदाज अभिषेक शर्माही आता प्रकाशझोतात आला आहे. अभिषेकने आक्रमक फलंदाजीच्या जोरावर आयपीएलमध्ये मोठा विक्रम केला आहे. आयपीएलच्या या हंगामात अभिषेक सर्वात चांगल्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली आहे. त्याने सुनील नरेन, हेनरिक क्लासेन आणि ट्रॅविस हेडसारख्या दिग्गज खेळाडूंना मागे टाकलं आहे.
अभिषेक शर्माने शुक्रवारी चेन्नई सुपर किंग्जविरोधात झालेल्या सामन्यात चमकदार कामगिरी केली. अभिषेकने १२ चेंडूत ३ चौकार आणि ४ षटकारांच्या जोरावर ३७ धावा केल्या आणि संघाला दमदार सुरुवात करुन दिली. त्यामुळे स्ट्राईक रेटमध्ये अभिषेकने सर्वांना पिछाडीवर सोडलं आहे. ज्या खेळाडूंनी या हंगामात कमीत कमी ५० चेंडू खेळले आहेत, त्यामध्ये अभिषेकचा स्ट्राईक रेट सर्वात चांगला आहे. २१७.५६ च्या स्ट्राईक रेटमुळे तो पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. तर सुनील नरेन २०६.१५ च्या स्ट्राईक रेटमुळे दुसऱ्या स्थानावर आहे. सनरायजर्स हैदराबादचा स्टार फलंदाज २०३.४४ च्या स्ट्राईक रेटमुळे तिसऱ्या नंबरवर आहे. तर ट्रेविस हेडने १८०.६४ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली आहे. तसच निकोलस पूरनने १७५.९० च्या स्ट्राईक रेटने धावा कुटल्या आहेत. पूरन पाचव्या स्थानावर आहे.
हैदराबादने चेन्नईचा केला पराभव
आयपीएल २०२४ च्या १८ व्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादने चेन्नई सुपर किंग्जचा ६ विकेट्सने पराभव केला. त्यामुळे आयपीएलच्या यंदाच्या हंगामात हैदराबादनने सलग दुसऱ्या विजयावार शिक्कामोर्तब केलं. हैदराबादच्या विजयात अभिषेक शर्माचा सिंहाचा वाटा होता. खेळपट्टी धीम्या गतीची असतानाही अभिषेकने पॉवर प्लेमध्ये आक्रमक फलंदाजी केली. अभिषेकने १२ चेंडूत ३७ धावांची वादळी खेळी केली.