अनेक गावातील पाणीपुरवठ्याचे स्रोत पुरामुळे दूषित, या गावांना टँकरने पाणीपुरठा करा- आमदार रणजित कांबळे
- रस्ते पुलांच्या झालेल्या नुकसानीची तातडीने दुरुस्ती करा, कायमस्वरूपी दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी उपलब्ध करावा.
- सोनोरा ढोक येथील पुनर्वसच्या प्रस्तावाचा पुन्हा शासनाला स्मरण पत्र पाठवा.
- शेती नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून मदत द्या, घरात पाणी शिरलेल्याना खावटी तातडीने वितरित करा.
- आमदार रणजित कांबळे यांची जिलधिकाऱ्यांसोबत बैठक.
भूपेश बारंगे,वर्धा | वर्धा जिल्ह्यात एका आठवड्यापासुन पावसाची संततधार सुरु आहे. सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक गावात पाणी शिरल्याने घरातील साहित्याची नासाडी झाली आहे. अनेक रस्ते आणि पूल, पाऊस व पुरामुळे वाहून गेले आहे. या रस्त्यांची,पुलांची तात्काळ दुरुस्ती करावी व कायमस्वरूपी उपायोजणेसाठी यांना जिल्हा नियोजन समितीतून निधी उपलब्ध करून देण्यात याव्या अश्या सूचना आमदार रणजित कांबळे यांनी जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांना दिल्या आहे.आमदार रणजित कांबळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पावसामुळे उद्धवलेल्या समस्याच्या निराकरणा बाबत आढावा बैठक घेतली आहे.
जिल्ह्यात सुरु असलेल्या पावसामुळे देवळी विधानसभा मतदारसंघातील देवळी, वर्धा आणि हिंगणघाट तालुक्यातील नदी काठच्या गावात पुराच्या पाण्यामुळे पाणी पुरवठयाचे स्रोत दूषित झाले आहे. या गावात येथून पाणीपुरवठा झाल्यास गावातील नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होणार यामुळे या गावांत जिल्हापरिषद यांच्याशी समन्वय साधून तात्काळ टँकरने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात यावा अश्या सूचना यावेळी आमदार कांबळे यांनी दिल्या आहेत. सोबतच अनेक शेतकऱ्यांची शेती आणि पीक नाल्या व नदीच्या पुरामुळे अक्षरशः खरडून गेली आहेत. तर काही ठिकाणी पिकांचे नुकसान झाले. या सर्व नुकसानीचा पंचनामा करून शासनाला शेतकऱ्यांना तात्काळ मदतीच्या दृष्टीने प्रस्ताव पाठवावा. यासोबतच ज्या गावातील घरामध्ये पुराचे पाणी शिरल्याने नुकसान झाले आहे त्यांना खावटी देत नुकसानीचा तहसीलदारांच्या माध्यमातून पंचनामा करून घ्यावा अश्या सूचनाही आमदार कांबळे यांनी दिल्या आहे.
सोनोरा ढोक या गावाच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव बाबत शासनला स्मरण पत्र पाठवा.
- देवळी तालुक्याच्या सोनोरा ढोक या गावात मागील दोन वर्षात नाल्याला येणाऱ्या पुरामुळे पाणी गावात शिरत आहे. मागील वर्षीसुद्धा या गावात पुराने मोठे नुकसान केले होते. या वर्षी सुद्धा हीच परिस्थिती निर्माण झाली आहे. 28 सप्टेंबर 2023 ला जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाच्या सचिवाना गावाच्या पुनर्वसनाबाबत प्रस्ताव पाठविण्यात आला होता, मात्र याला अद्याप मंजुरी मिळाली नाही. या गावाच्या पुनर्वसनाच्या प्रस्ताव बाबत पुन्हा शासनाला आताच्या परिस्तितीचा अहवाल जोडून स्मरण पत्र पाठविण्याच्या सूचना आमदार कांबळे यांनी जिल्हाधिकारी यांना दिल्या आहे. एवढच नव्हे तर आमदार कांबळे यांनी राज्याचे पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांना याबाबत माहिती देत तात्काळ प्रस्तावाला मंजुरी देण्याची विनंती केली आहे.