Covid19 मुळे प्रकृती खालावली; सोनिया गांधी रुग्णालयात भरती
काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना आज कोविडच्या त्रासामुळे सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी याबाबत माहिती दिली आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. सोनिया गांधींना काहींना कोरोनाची लागण झाली होती, त्यानंतर त्या हळूहळू बरी होत होत्या. मात्र प्रकृती खालावल्याने त्यांना आज सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सोनिया गांधी 2 जून रोजी कोरोना पॉझिटिव्ह आल्या
सोनिया गांधी 2 जून रोजी कोरोना पॉझिटिव्ह आल्या होत्या, त्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर झाली होती. नॅशनल हेराल्ड प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ED) सोनिया गांधी यांना २३ जून रोजी चौकशीसाठी बोलावलं होतं. यापूर्वी 8 जून रोजी सोनिया गांधी यांना ईडीने चौकशीसाठी बोलावलं होतं. पण कोरोनाची लागण झाल्यामुळे सोनिया गांधी ईडी कार्यालयात गेल्या नाहीत. त्यानंतर आता 23 जूनला त्यांना बोलावण्यात आलं आहे.
ईडी उद्या राहुल गांधींची चौकशी करणार
राहुल गांधींना ईडीने नॅशनल हेराल्ड प्रकरणात 2 जून रोजी चौकशीसाठी बोलावलं होतं. त्यावेळी राहुल गांधी भारतात नव्हते, त्यामुळे त्यांनी ईडीकडे नवीन तारीख मागितली होती. त्यानंतर राहुल गांधींना ईडीने 13 जून रोजी चौकशीसाठी बोलावलं आहे. त्याचवेळी नॅशनल हेराल्डसंदर्भात आज काँग्रेस पक्ष देशभरात पत्रकार परिषद घेत आहे.